Published On : Thu, Oct 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या सुरक्षेसाठी CP नांगरे पाटील यांचा नवा रोडमॅप; गंभीर गुन्हे, ड्रग्जसह वाहतूक व्यवस्थेवर लक्ष!

Advertisement

Auto Draft

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, महिला सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि पोलीस दलाच्या मनुष्यबळाबाबत भूमिका स्पष्ट केली.

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी आयपीएस अधिकारी झालेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून केली. सुमारे ३० वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई आवश्यक-

तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढणे ही चिंतेची बाब आहे. अमली पदार्थांच्या मोठ्या तस्करीमागील सूत्रधार आणि पेडलर्सवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नसून गुन्हेगारांचे समुपदेशन आणि समाजात जनजागृती करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

महिलांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी नागपूरमध्ये १२ निर्भया पथके तयार करण्यात आली असून, २४ तास बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

९,५०० पोलिसांच्या मनुष्यबळाचे नियोजन
नागपूर शहराची लोकसंख्या आणि वाढत्या गरजा लक्षात घेता उपलब्ध पोलीस मनुष्यबळाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात सुमारे ९,५०० पोलीस कर्मचारी असल्याचा उल्लेख करत त्यांनी पोलीस ठाण्यांमधील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि भरती यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली.

शहरातील खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाहतूक सुरळीत ठेवणे, पार्किंगची समस्या सोडवणे आणि फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे यावरही भर दिला जाणार आहे.

आंदोलनासाठी परवानगी; कायदा हातात घेणे चुकीचे-

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेणे चुकीचे आहे. पोलिसांकडून नियमानुसार आंदोलनासाठी परवानगी दिली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.