
नागपूर : कॉटन मार्केट मेट्रो स्थानकाजवळील ‘सद्गुरू सेल्स’ या किराणा दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अवघ्या दोन मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग नियंत्रणात आणल्याने शेजारच्या दुकानांमध्ये आग पसरण्यापासून बचाव झाला आणि मोठा अनर्थ टळला.
आगीत दुकानातील मॅगी, बिस्किटे, चॉकलेट, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर किराणा माल पूर्णपणे जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री दुकानातून धूर आणि आगीच्या उंच ज्वाळा दिसू लागताच नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.





