Published On : Wed, Aug 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार; पोलीस आयुक्तांकडून पाहणी हल्लेखोरांचा शोध तीव्र

Advertisement

Nagpur CP visits Congress Corporator’s house after firing; assures family of swift action

नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मोटघरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

गोळीबाराच्या घटनेला २४ तास उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र, आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची अनेक पथके सक्रिय करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यासोबतच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयितांचा माग काढला जात आहे.

घरावर गोळ्या झाडल्या, कुटुंब सुरक्षित-
मंगळवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी मोटघरे यांच्या घरावर गोळीबार केला. गोळीबाराच्या वेळी कुटुंबीय घरातच होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराच्या काचा फुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आसपासच्या भागातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

संशयितांची चौकशी सुरू-
तपासादरम्यान काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तपास अधिकाऱ्यांकडून संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खंडणीच्या प्रकरणाचा संबंध आहे का?
गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी नगरसेवक शुभम मोटघरे यांनी खंडणी मागणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गोळीबाराशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.

याशिवाय राजकीय वैमनस्य, वैयक्तिक वाद आणि इतर संभाव्य कारणांचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, कोणत्याही कारणाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

नेत्यांची घटनास्थळी धाव-
गोळीबाराची माहिती मिळताच काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोटघरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. भाजप नगरसेवक अतुल कोटेचा यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळाची माहिती घेतली.

सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि संशयितांची चौकशी या तिन्ही दिशेने पोलिसांचा तपास सुरू असून, आता हल्लेखोरांच्या अटकेकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.