नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी ठाणेदारांची चांगलीच कानउघाडणी करत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला.
१६ सप्टेंबर रोजी हवालदार सचिन तायडे आणि अंमलदार मनीष उत्तमराव मेश्राम यांना एसीबीने लाच स्वीकारताना पकडले होते. पोलिसांकडून कारवाईपासून वाचवण्याचे आश्वासन देत कथित आरोपीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर आयुक्त नांगरे पाटील यांनी जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल ताकसांडे यांना तातडीने नियंत्रण कक्षात हलवले. तसेच सर्व ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचखोरीपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
‘एसीबीची कारवाई म्हणजे केवळ एका कर्मचाऱ्याची बदनामी नाही, तर संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का आहे,’ असा स्पष्ट संदेश देत पोलिसांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि कम्युनिटी पोलिसिंगसोबतच भ्रष्टाचारमुक्त पोलीसिंगला प्राधान्य दिले आहे.




