
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये आधुनिकतेच्या काळातही तीन पिढ्यांपासून गौरी महालक्ष्मीच्या भक्तीची परंपरा अखंडपणे जपली जात आहे. अल्लीपूर येथील गुणवंत काशिनाथ ढगे यांच्या कुटुंबात गेल्या तीन पिढ्यांपासून भाद्रपदातील ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी महालक्ष्मीची स्थापना केली जाते. श्रद्धा, संस्कार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव आजही कुटुंबाला आणि गावकऱ्यांना एकत्र आणतो.
अल्लीपूर येथील गुणवंत काशिनाथ ढगे यांच्या घरी तीन पिढ्यांपासून गौरी महालक्ष्मी स्थापनेची परंपरा सुरू आहे. आजोबांनी सुरू केलेली ही भक्तीची परंपरा त्यांच्या वडिलांनी जपली आणि आता गुणवंत ढगे आपल्या कुटुंबासह ती पुढे नेत आहेत.
शेती आणि कष्टाच्या जीवनात सुख-समृद्धी आणि भरभराट लाभावी, या श्रद्धेतून ढगे कुटुंबाच्या पूर्वजांनी महालक्ष्मीची स्थापना करण्याचा संकल्प केला होता. तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीला माहेरवाशीण म्हणून घरी आणले जाते.
अडीच दिवस माहेरवाशीणीचा थाट
गौरी महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी ढगे कुटुंबात घराची स्वच्छता, सजावट आणि पूजेची तयारी केली जाते. आगमनाच्या दिवशी दोन महालक्ष्मींच्या मूर्तींना पारंपरिक पद्धतीने सजवले जाते. नव्या साड्या, नथ, ठुशी, बांगड्या आणि फुलांच्या माळांनी महालक्ष्मींचे रूप अधिक खुलून दिसते.
अडीच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विधिवत पूजा, सकाळ-संध्याकाळ आरती आणि पारंपरिक नैवेद्याची परंपरा जपली जाते. पुरणपोळी, भजे आणि १६ भाज्यांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण केला जातो.
या काळात घरात माहेरवाशीण आल्याचा आनंदाचे वातावरण असते. नातेवाईक, शेजारी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी आणि हळदी-कुंकवासाठी उपस्थित राहतात.
तीन पिढ्यांची परंपरा गावासाठी प्रेरणादायी
आजच्या काळात अनेक पारंपरिक सण-उत्सवांचे स्वरूप बदलत असताना, ढगे कुटुंबाने तीन पिढ्यांपासून ही परंपरा श्रद्धेने जपली आहे. त्यामुळे त्यांची गौरी महालक्ष्मीची पूजा अल्लीपूरमधील इतर कुटुंबांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
“ही केवळ पूजा किंवा परंपरा नसून आमच्या घराचे संस्कार आहेत. आजोबांनी लावलेला भक्तीचा दिवा पुढच्या पिढीपर्यंत असाच तेवत ठेवायचा आहे,” अशी भावना गुणवंत काशिनाथ ढगे यांनी व्यक्त केली.
गौरी महालक्ष्मीच्या या उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच कुटुंबातील एकोपा आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहण्याचा संदेशही दिला जात आहे.
प्रतिनिधी – सतीश काळे, वर्धा




