
नागपूर : महाराष्ट्रातील महागड्या विजेच्या प्रश्नावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपुरात राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. महागड्या दराने कोळसा खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा तातडीने रद्द करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पटोले यांनी दिला. महागड्या कोळसा खरेदीच्या माध्यमातून राज्यातील जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पटोले म्हणाले, महाराष्ट्रात आधीच देशातील सर्वाधिक महागडी वीज मिळत आहे. त्यात आता सरकारने दरवर्षी ३० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्यासाठी नवीन निविदा काढली आहे. या निविदेत पुरेशी स्पर्धा नसल्याने सरकारला महागड्या दराने कोळसा खरेदी करावा लागू शकतो.
यापूर्वी व्यापाऱ्यांकडून कोळसा खरेदी केला जात होता. त्यामुळे वेळेत पुरवठा होत होता आणि दर्जेदार कोळसाही उपलब्ध होत होता. मात्र आता विशिष्ट कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला.
कोळसा धुलाई प्रकल्प असलेल्या कंपन्यांकडे कोळसा उपलब्ध असतानाही त्यांच्याकडून खरेदी का केली जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रक्रियेमागे नेमका कोणाचा फायदा आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
कोळसा निविदा रद्द करा, अन्यथा आंदोलन-
ऊर्जा विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून निविदा रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र पाठविल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
महागड्या कोळशामुळे वीज निर्मितीचा खर्च वाढणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होईल. आधीच महागड्या विजेमुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांकडे वळत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारच्या या निर्णयामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.
‘कोळसा खरेदीची ही निविदा रद्द केली नाही, तर आम्ही आंदोलन करू,’ असा स्पष्ट इशारा नाना पटोले यांनी दिला.
राहुल गांधींच्या नागपूर दौऱ्याची उत्सुकता-
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आगामी नागपूर दौऱ्याबाबतही नाना पटोले यांनी माहिती दिली. राहुल गांधी यांच्या देशभरातील कार्यक्रमांचे नियोजन पाहून नागपूर दौऱ्याची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नाशिकमध्ये चर्चा झाली असून आगामी काळात पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या विकासकामांवरूनही सरकारवर निशाणा-
नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली सर्वत्र रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांची कामे सुरू असताना पुढील काळात ही विकासकामे कशी पूर्ण केली जाणार, असा सवाल पटोले यांनी केला.
विकासकामांच्या नावाखाली मंदिरे पाडली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. कुंभमेळ्याला काँग्रेसचा विरोध नाही; मात्र कुंभमेळ्याच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि मंदिरांची तोडफोड आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही सरकारला घेरले-
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचे पटोले म्हणाले. सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने ओबीसींसह विविध समाजघटकांमध्ये असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला.
जीडीपीच्या आकडेवारीवरून मोदी सरकारवर टीका-
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.८ टक्के असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. आर्थिक विकासाचे चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात असेल, तर हा गंभीर विषय असल्याचे पटोले यांनी म्हटले.
अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीवर प्रश्न-
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गुन्हा दाखल होऊन सखोल तपास व्हायला हवा होता, असे नाना पटोले म्हणाले. सरकार या प्रकरणातील माहिती सार्वजनिक का करत नाही? सरकार नेमके काय लपवत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंदिरांच्या मुद्द्यावर सरकार दुटप्पी भूमिका –
पाकिस्तानातील मंदिरांच्या तोडफोडीवर सरकारकडून प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमध्ये विकासकामांच्या नावाखाली मंदिर पाडले जात असल्याचा आरोप होत असताना सरकार गप्प का आहे, असा सवाल पटोले यांनी केला.
नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी महागडा कोळसा, महागडी वीज, बेरोजगारी, नाशिकमधील विकासकामे आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. आता महागड्या कोळसा खरेदीची निविदा सरकार रद्द करते की काँग्रेस प्रत्यक्ष आंदोलनाची भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.




