
नागपूर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण तसेच लेझर लाईटमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे.
बंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करून उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन-
डीजेऐवजी ढोल-ताशे, बँड, संदल आणि भजन यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.




