नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमली पदार्थविरोधी कृती दलाने मोठी कारवाई केली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहनगर परिसरात पेट्रोल पंपाजवळ गस्तीवर असताना पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपींकडून १३ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आणि ३९ ग्रॅम साधा गांजा, असा एकूण ५२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय दोन भ्रमणध्वनी आणि एक बजाज चेतक विद्युत दुचाकी असा एकूण १ लाख ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख रोहित संजय गोलानी आणि राहुल लखानी अशी झाली असून, दोघेही खामला परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात राहुल हा मालवाहतूक पोहोचविण्याचे काम करत असून, रोहित याचे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान असल्याचे समोर आले आहे.
आरोपींना हा गांजा नेमका कुठून मिळाला आणि त्याची पुढील पुरवठा साखळी कोणापर्यंत पोहोचणार होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागपूर शहरात प्रथमच हायड्रोपोनिक गांजाची खेप आढळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या नागपूर पथकाने ही कारवाई केली.




