Published On : Mon, Jul 16th, 2018

Nagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सुयोग’ला भेट

Advertisement

CM-Fadnavis

Nagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवासाला भेट देऊन पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

प्रारंभी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, शिबीरप्रमुख महेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नाणार प्रकल्प, महाकर्जमाफी, पीककर्जवाटप, समृद्धी महामार्ग, दूध आंदोलन आदी विविध विषयांवर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 3 रुपये वाढीची घोषणा यापूर्वीच केली आहे. याबाबत आवश्यक चर्चेसाठी शासन सदैव तयार आहे. दुधावर प्रक्रिया करुन पदार्थ निर्यातीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांचे कामाचे तास आणि ताण अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कमी करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. पात्र असूनही केवळ तांत्रिक बाबीअभावी वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या हेतूने योजना अधिक व्याप्त केली. त्यामुळे मुदतवाढ दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाणार प्रकल्पाची साईट प्राथमिक अभ्यासाअंतीच निश्चित केली आहे. त्यानंतरही विविध अंगांनी अभ्यास होत आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांची सखोल शास्त्रीय अभ्यासातून उत्तरे दिली जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अ. भा. साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींसमवेत भेट घेऊन चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

पालघर येथील पत्रकारांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, विशेष कार्य अधिकारी केतन पाठक, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, संचालक (नागपूर-अमरावती) राधाकृष्ण मुळी, ‘सुयोग’चे व्यवस्थापक श्री. बारई यांच्यासह अनेक अधिकारी व पत्रकार बांधव आदी यावेळी उपस्थित होते.