
नागपूर : नागपूर शहराच्या उत्तर दिशेने झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक व निवासी विकासाला अनुसरून खापरखेडा पोलिस ठाण्याचा समावेश आता औपचारिकरीत्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे. यामुळे नागपूर शहरातील एकूण पोलिस ठाण्यांची संख्या आता ३५ झाली आहे.
राज्य गृह विभागाने दिनांक २८ जुलै रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून, या निर्णयानुसार खापरखेडा पोलिस ठाण्याचा समावेश शहरातील परिमंडळ क्रमांक ६ मध्ये करण्यात येणार आहे. या परिमंडळात याआधीच कलमना व पारडी पोलिस ठाणे समाविष्ट आहेत. अधिसूचनेवर गृह विभागाचे उप सचिव रा.ता. भालवणे यांची स्वाक्षरी आहे.
खापरखेडा परिसरात औष्णिक विद्युत प्रकल्प, खासगी व शासकीय उद्योग तसेच निवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्या असून, या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार व नागरिक स्थायिक झाले आहेत. वाढती लोकसंख्या, औद्योगिक घनता आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ लक्षात घेता या भागातील पोलिस यंत्रणा बळकट करणे गरजेचे होते.
नवीन निर्णयानुसार, शहर पोलिस दलातून ५६ अधिकारी व अंमलदारांची नेमणूक खापरखेडा ठाण्यात केली जाणार आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व शिपाई यांचा समावेश आहे. सध्या कार्यरत असलेली खापरखेडा पोलिस ठाण्याची इमारतही आता शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणार आहे.
खापरखेडा शहर हद्दीत समाविष्ट झाल्यामुळे तपास कार्यात येणाऱ्या सीमावर्ती अडचणी दूर होतील, तसेच पोलिसांची हालचाल व प्रतिसादक्षमता अधिक परिणामकारक होईल. नागपूरच्या उत्तर भागाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा व स्वागतार्ह ठरणार आहे.









