Published On : Sat, May 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गोवंश तस्करांवर राज्यातील पहिली मकोका कारवाई; २७ आरोपींवर गुन्हे दाखल

Advertisement

नागपूर : राज्यात प्रथमच गोवंश तस्करांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाने गोवंश तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात नऊ जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील भिवापूर आणि कळमेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच दोन स्वतंत्र मकोका कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण २७ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

छत्तीसगड ते हैदराबाद या मार्गावर गोवंश तस्करीच्या घटनांवर सातत्याने कारवाई केली जात असली, तरी गोवंश तस्करांवर मकोका लावण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मकोका हा संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठीचा विशेष कायदा असून, गुन्हेगारांना मदत करणाऱ्या व्यक्तींवरही या कायद्यांतर्गत कारवाई करता येते. तसेच गुन्ह्यातून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या अबुझमाड सीमेलगतच्या कापेवंचा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त केले.

Advertisement

या कारवाईत ग्रेनेड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सुमारे ५०० पाईप तसेच लघु रॉकेट निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी हे साहित्य जंगलात लपवून ठेवले होते. अशा प्रकारचे साहित्य पोलिसांच्या ताब्यात येणे अत्यंत महत्त्वाचे असून, ते पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय धोका टळल्याचे म्हणता येणार नाही, असेही पोलिसांनी नमूद केले.

नक्षलवादी आत्मसमर्पण करत असले तरी त्यांच्या ताब्यातील शस्त्रास्त्रांचे आणि स्फोटक साहित्याचे समर्पण होणे तितकेच आवश्यक असल्याचे मत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.