Published On : Thu, Jun 17th, 2021

येत्या 6 महिन्यात नागपूर-बुटीबोरी महामार्ग 6 पदरी करणार : ना. गडकरी

-बुटीबोरी उड्डाणपुलाचा लोकार्पण समारंभ
-बुटीबोरी न.प. दत्तक घेणार
-नागपूर मेट्रो बुटीबोरीपर्यंत आणणार

नागपूर: बुटीबोरी शहरात रस्ते व सर्वच पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाव्या या दृष्टीने एक विकासाचा एक आराखडा तयार करण्याच्या सूचना करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 6 महिन्यात नागपूर ते बुटीबोरी हा 6 पदरी रस्ता बनवून देऊ, तसेच नागपूरची मेट्रो बुटीबोरीपर्यंत आणण्यासाठी लवकरच काम सुरु होईल, असे आश्वासन बुटीबोरी येथे दिले. तसेच बुटीबोरी न.प. आपण दत्तक घेणार असल्याचेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.

बुटीबोरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, आ. समीर मेघे, आ. गिरीश व्यास, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. सुधीर पारवे, अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, बबलू गौतम, चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे, श्रीमती संध्या गोतमारे, आकाश वानखेडे, प्रवीण शर्मा, आतीष उमरे, दिलावर खान, अविनाश गुजर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले- अत्यंत महत्त्वाचा हा उड्डाणपूल आहे. हे स्थळ अपघातप्रवण होते. इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्तम झाले आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आ. समीर मेघे यांनी चांगलाच पाठपुरावा केला. बुटीबोरी ही राज्यातील आदर्श नगर परिषद बनावी या दृष्टीने एक विकास आराखडा तयार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- येत्या 5 वर्षात नागपूरला ‘ग्रीन नागपूर’ बनवू. ध्वनी प्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम केले जात आहे. तसेच सीएनजीचा पंप बुटीबोरीत लावण्याचाही आपला प्रयत्न आहे. ट्रक आणि बसेस सीएनजीवर चालल्या तर प्रदूषण कमी होईल. बुटीबोरीत चांगली शाळा महाविद्यालये, लोकांसाठी चांगला बाजार, परवडणारी घरे बनावी. एक आदर्श टाऊनशिप म्हणून या शहराचा विकास व्हावा व राज्यातील सुंदर शहर बनावे म्हणून काम करण्याची गरज आहे.

नागपुरात नागनदी सौंदर्यीकरणासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- येत्या दोन तीन वर्षात अंबाझरी ते पारडी हा प्रवास आपण नावेतून करणार आहो. पर्यटनाच्या दृष्टीने नाग नदीचा विकास करण्यात येत आहे. बुटीबोरीतही व्हेंटीलेटर्ससह सर्व सुविधायुक्त आदर्श हॉस्पिटल तयार करण्यात यावे यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

बुटीबोरी उड्डाणपुलावर 69.27 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून डिसेंबर 2018 मध्ये हे काम सुरु झाले. बुटीबोरी टी जंक्शनला राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची व स्थानिक बुटीबोरी गावाकून येणारी व एमआयडीसी क्षेत्रातून येणारी जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. ती आता होणार नाही. 1.69 किमीचा हा सहा पदरी उड्डाणपूल आहे.

उड्डाणपुलावर 80 किमी प्रतितास वेगाने वाहने वाहतूक करू शकतील. उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्याची रुंदी 24 मीटर आहे. या उड्डाणपुलामुळे इंधनात बचत आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. उड्ाणपुलाच्या खालील भागात वृक्षारोपण, लँडस्केपिंग करून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृत पार्किंगला आळा बसणार आहे.