
नागपूर : नागपुरात व्यावसायिक व्यवहाराच्या नावाखाली लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 55 लाख 90 हजार रुपयांचा सब्लिमेशन पेपर खरेदी करून त्यापैकी 10 लाख 79 हजार 166 रुपये थकविल्याचा आरोप लुधियानातील व्यापाऱ्यावर करण्यात आला आहे. थकीत रक्कम मागितल्यावर शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जागनाथ बुधवारी परिसरातील रहिवासी अनिकेत राजेश सेठिया हे सब्लिमेशन पेपरच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, लुधियाना येथील चिनाब डोजिया मिल्सचे प्रोप्रायटर चेतन टंडन यांनी ऑनलाइन माध्यमातून त्यांच्याकडून 55 लाख 90 हजार रुपयांचा सब्लिमेशन पेपर खरेदी केला होता. या व्यवहारापोटी आरोपीने 45 लाख 11 हजार रुपये दिले, मात्र उर्वरित 10 लाख 79 हजार 166 रुपये देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
थकीत रक्कम मिळवण्यासाठी अनिकेत यांनी फोनवरून संपर्क साधला असता, आरोपीने कथितरीत्या अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे तहसील पोलिसांनी चेतन टंडन यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



