
नागपूर : राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात पोलिसांनी पुन्हा कारवाईला वेग दिला आहे. तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने आणखी एका शिक्षकाला अटक केली आहे. ज्ञानेश्वर शिवराम जाधव (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील चित्रलेखा प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तपासादरम्यान जाधव यांचे शालार्थ ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. बुधवारी त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणात सायबर पोलिसांकडून करण्यात आलेली ही ४५ वी अटक आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणातील अटकसत्र थांबल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा एका शिक्षकाला अटक झाल्याने संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट ओळखपत्रे-
शालार्थ घोटाळा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उघडकीस आला होता. प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून आतापर्यंत सुमारे ५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथितरीत्या बनावट शालार्थ ओळखपत्रे जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पुढील तपासात या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र तपास समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. नागपूरसोबतच नाशिक आणि राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आली. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता-
नागपूर विभागात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, शिक्षक, शाळा संचालक तसेच अन्य कर्मचाऱ्यांसह एकूण ४५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.सहा महिन्यांनंतर पुन्हा एका शिक्षकाला अटक झाल्याने या प्रकरणाने नव्याने लक्ष वेधले आहे. सध्या सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासाची व्याप्ती वाढल्यास काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या घोटाळ्यातील पुढील कारवाईकडे शिक्षण विभागासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



