
नागपूर : राजकीय आंदोलनांमध्ये घोषणाबाजी आणि निदर्शने नेहमीच पाहायला मिळतात. मात्र नागपुरात भाजयुमोने राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची ‘मानसिक तपासणी’ करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून तो प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात आणला. यावेळी भाजयुमोचे प्रशांत भोयर यांनी डॉक्टरची भूमिका साकारत पुतळ्याचे ‘चेकअप’ केले. त्यानंतर पुतळ्याला ‘मानसिक उपचारांची गरज’ असल्याचा उपरोधिक दावा करत त्याला रुग्णालयात दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
राहुल गांधी सातत्याने भारतीय जनता पक्षावर नकारात्मक टीका-टिप्पणी करत असल्याचा आरोप भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या विविध राजकीय वक्तव्यांवर उपरोधिक भाष्य करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांच्या राजकीय भूमिकेचा निषेध नोंदवला.
भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दया शंकर तिवारी, भाजयुमो अध्यक्ष सचिन करावे आणि प्रशांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टरचा वेश, प्रतीकात्मक पुतळ्याची ‘तपासणी’ आणि ‘रुग्णालयात भरती’ करण्याची कृती यामुळे आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.



