नागपूर : शहरातील मेडिकल चौक येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून बेअरर धनादेश लंपास करून बनावट आधार कार्डच्या आधारे 26 लाखांची रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा मेडिकल चौक शाखेचे व्यवस्थापक विशाल महादेवराव आवठारे (वय 41, रा. रॉयल हाइट्स, न्यू प्रेरणा नगर, काटोल रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
15 जुलै 2026 रोजी सकाळी 11.40 ते दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान एका ग्राहकाने बेअरर धनादेश जमा करण्यासाठी बँकेच्या काउंटरवर दिला होता. याच दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी संधी साधून हा धनादेश चोरल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी सीताबर्डी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत जाऊन बनावट आधार कार्ड सादर केले. संबंधित खातेदाराची बनावट ओळख निर्माण करून त्यांनी 26 लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात काढली आणि तेथून पसार झाले.
ही बाब लक्षात आल्यानंतर बँक प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. या फसवणुकीमुळे बँक तसेच संबंधित ग्राहकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक, चोरी, बनावट कागदपत्र तयार करणे, बनावट कागदपत्रांचा वापर, खोटी ओळख धारण करणे आणि कट रचणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे.




