
नागपूर : धर्मगुरूचा वेश धारण करून ओळख लपवत नागपुरात तब्बल दोन वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला भोपाळ एटीएसने यशोधरानगर पोलिसांच्या मदतीने अटक केली. जॉर्ज चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री एटीएसच्या पथकाने नागपुरात कारवाई करत जॉर्जला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी ग्वाल्हेर येथे नेण्यात आले. प्रवेश नगर परिसरातील एका धार्मिक स्थळावर जॉर्जने आपली खरी ओळख लपवून धर्मगुरू म्हणून आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ग्वाल्हेरमध्ये दाखल असलेल्या एका प्रकरणाच्या तपासादरम्यान भोपाळ एटीएसला जॉर्ज नागपुरात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसचे पथक नागपुरात दाखल झाले. यशोधरानगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून जॉर्जला अटक करण्यात आली.
जॉर्ज हा सुमारे २० बांगलादेशी युवकांसोबत बेकायदेशीररीत्या भारतात दाखल झाल्याचा संशय आहे. भारतात आल्यानंतर हे युवक ग्वाल्हेरमध्ये राहत होते. या प्रकरणात इतर आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती; मात्र जॉर्ज फरार होता. ग्वाल्हेरमधून तो वडोदरा आणि त्यानंतर नागपुरात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या भारतातील वास्तव्याबाबत आणि इतर साथीदारांबाबत एटीएसकडून पुढील तपास सुरू आहे.




