Published On : Tue, Oct 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बँडच्या पैशांवरून रक्तरंजित वाद;चाकूहल्ल्यात २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चार संशयित पोलिसांच्या ताब्यात, गिट्टीखदान पोलिसांकडून तपास सुरू
Advertisement

नागपुरात बँडच्या पैशांवरून रक्तरंजित वाद;चाकूहल्ल्यात २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नागपूर : बँड वाजवण्याच्या कामाच्या पैशांवरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंड टोली परिसरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २९ वर्षीय तरुणाचा मंगळवारी सकाळी मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिजीत ऊर्फ बाबा सिडाम असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढराबोडी परिसरातील रहिवासी असलेला अभिजीत बँड वाजवण्याचे काम करीत होता. या कामानिमित्त तो काही तरुणांसोबत कारंजा येथे गेला होता. कार्यक्रमाच्या पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. आयोजकांकडून पैसे न मिळाल्याने अभिजीतला आपल्या सहकाऱ्यांचे पैसे देता आले नसल्याची चर्चा आहे. याच वादातून त्याचे सहकारी बँजो वाजवण्यासाठी वापरली जाणारी मिक्सर मशीन सोबत घेऊन आल्याचे सांगितले जाते.

याच मुद्द्यावरून रात्री उशिरा गोंड टोली परिसरात वाद वाढला. यावेळी चार ते पाच तरुणांनी अभिजीतवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजीतला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण, घटनाक्रम आणि संबंधितांची भूमिका याबाबत गिट्टीखदान पोलीस तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.