nagpur-ashoka-cockroachनागपूर : शहरातील सदर परिसरातील प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली. जेवणासाठी आलेल्या ग्राहकाने हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी पाठवले असून रेस्टॉरंटच्या स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का, याचीही चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, रेस्टॉरंट व्यवस्थापनानेही घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत चूक झाल्याचे मान्य केले असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या घटनेमुळे शहरातील हॉटेलमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.




