
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळत असताना महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आधुनिकीकरण आणि विस्तार प्रकल्पाला सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात PPP मॉडेलअंतर्गत मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे नागपूर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीची जमीन ६ ऑगस्ट २०३९ नंतरही लीजवर उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मिहान इंडिया लिमिटेडला विमानतळाचे संचालन खासगी भागीदार GMR Nagpur International Airport Limited यांच्याकडे पुढील ३० वर्षांसाठी सोपवता येणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प ‘मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अॅट नागपूर’ अर्थात MIHAN अंतर्गत विकसित केला जात आहे. नागपूरला देशातील महत्त्वाचे विमानवाहतूक आणि कार्गो केंद्र बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
२००९ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी संयुक्तपणे मिहान इंडिया लिमिटेडची स्थापना केली होती. त्यानंतर विमानतळाची मालमत्ता MIL कडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र जमीन सीमांकनाशी संबंधित वादामुळे लीज प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
दरम्यान, २०१६ मध्ये PPP मॉडेलअंतर्गत विमानतळ संचालनासाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात GMR कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती. मात्र २०२० मध्ये ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. हा निर्णय न्यायालयात आव्हान देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी मिहान इंडिया लिमिटेड आणि GNIAL यांच्यात कन्सेशन करार झाला.
आता लीज मुदतवाढीच्या निर्णयानंतर विमानतळ हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार आहे. सरकारच्या विकास आराखड्यानुसार नागपूर विमानतळाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार असून भविष्यात दरवर्षी सुमारे ३ कोटी प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे विदर्भातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असून उद्योग, व्यापार आणि कार्गो वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल. आधुनिक सुविधा, खासगी गुंतवणूक आणि सुधारित प्रवासी सेवा यामुळे नागपूर विमानतळ देशातील अत्याधुनिक विमानतळांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








