
नागपूर : एअरलाईनमध्ये केबिन क्रूची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ३ लाख २६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी तरुणाला एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून स्वतःचे नाव जाहगीर खान असल्याचे सांगितले. फिर्यादी इंडिगो एअरलाईनमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने त्याला रियाद इंटरनॅशनल एअरलाईनमध्ये केबिन क्रूची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच ई-मेलद्वारे भरतीची जाहिरात पाठवून विश्वास संपादन केला.
आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने विविध कारणांसाठी वेगवेगळ्या तारखांना एकूण ३ लाख २६ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने ना नोकरी मिळवून दिली, ना रक्कम परत केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे वाठोडा पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.




