Published On : Fri, Aug 16th, 2019

नागपूरचे ‘इनोव्हेशन’ जागतिक स्तरावर पोहचविण्याचा मानस : महापौर नंदा जिचकार

‘इनोव्हेशन पर्व’ निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

नागपूर : शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या नागपूर शहरातील प्रत्येक प्रकल्प देशात पथदर्शी ठरावा, असा नागपूर शहराचा विकास सुरू आहे. आता विविध शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना देता यावा, यासाठी नागपूर महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. ‘इनोव्हेशन पर्व’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नवसंकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांच्या संकल्पनांना जागतिक स्तरावर पोहचविण्याचा मानस आहे. यासाठी विविध त्यांच्या संकल्पनांना उद्योगात परिवर्तीत करण्याच्या दृष्टीने बळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांची भूमिका यामध्ये मोठी असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून २३ आणि २४ ऑगस्ट रोजी मानकापूर येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यातआले होते. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा इनोव्हेशन पर्वचे नोडल अधिकारी अझीझ शेख, नगरसेविका रूपा रॉय, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहीतकर, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, नागपुरात होत असलेल्या इनोव्हेशन पर्वची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत आहे. निती आयोगाअंतर्गत संचालित अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक स्वत: यामध्ये सहभागी होत आहेत. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या कालावधीत शासकीय विभागांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना बळ मिळेल, त्यांना उद्योग उभारणीसाठी मदत मिळेल अशा पद्धतीचे स्टॉल्स कार्यक्रम परिसरात लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण करण्याची व्यवस्थाही कार्यक्रम स्थळी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तत्पूर्वी इनोव्हेशन पर्वचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी इनोव्हेशन पर्वच्या दोन दिवसांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, उपक्रमाचा उद्देश आणि शासकीय विभागाच्या सहभागाच्या निमित्ताने त्यांच्याकडून अपेक्षा याबद्दल विस्तृत विवेचन केले.. इनोव्हेशन पर्वच्या माध्यमातून नवसंकल्पना केवळ मांडल्याच जाणार नाही तर त्या संकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष कार्यात कसा करण्यात येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. उपक्रमाची तयारी, शासकीय विभागांना त्यांच्या योजनांचे सादरीकरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्टॉल्सविषयी आणि विद्यार्थी, तज्ज्ञ, दर्शक यांच्या सहभागाविषयीची संपूर्ण माहिती नोडल अधिकारी अझीझ शेख यांनी उपस्थितांना दिली.

स्टॉल्सवरून मिळणार माहिती
बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘इनोव्हेशन पर्व’मध्ये त्यांच्या सहभागाबाबत माहिती दिली. नागपूर मेट्रोच्या स्टॉलवरून ‘महाकार्ड’ आणि नागपूर मेट्रोच्या फीडर सर्व्हिस विषयी माहिती उपलब्ध होणार आहे. महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेले ॲप, त्यावरील नोंदणी पद्धती आणि महावितरणने नुकतेच लॉन्च केलेले ई-वॉलेट याबद्दल महावितरणच्या स्टॉलवरून उपस्थितांना माहिती मिळेल. यासोबतच महात्मा फुले विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र आदींचे स्टॉल्स कार्यक्रम स्थळी राहणार असून त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तेथे उपलब्ध असेल.