नागपूर : शहरात ‘अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम’ (एईएस) या गंभीर मेंदूज्वरासारख्या आजाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आतापर्यंत एकूण आठ रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये पाच रुग्ण मध्यप्रदेशातील, दोन नागपूर शहरातील व एक नागपूर ग्रामीण भागातील आहे.
एईएस हा मेंदूवर परिणाम करणारा आजार असून वेळेत उपचार न झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात सर्व आरोग्य केंद्रांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेची सतर्कता-
- शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, एईएसशी संबंधित लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी.
- संशयित रुग्णांच्या चाचण्या व उपचार तातडीने सुरू करण्यावर भर दिला जात आहे.
- जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना लक्षणे दुर्लक्षित न करण्याचं आवाहन केलं जात आहे.
काय आहे ‘एईएस’?
‘अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम’ (AES) म्हणजे मेंदूत होणारी तीव्र सूज किंवा दाह.
लक्षणे :
- अचानक तीव्र ताप येणे
- चक्कर येणे व गोंधळणे
- झटके येणे
- बेशुद्ध होणे
- काही रुग्णांना बोलण्यात किंवा चालण्यात अडचण येणे
नागरिकांना आवाहन-
डॉक्टरांच्या मते, ताप, झटके किंवा बेशुद्ध होण्याची लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात जावे. विलंब झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.
नागपूरकरांना महापालिकेने सावध राहण्याचं आणि कोणतीही लक्षणं दिसताच वैद्यकीय मदत घेण्याचं आवाहन केलं आहे.