
नागपूर : नशा आणि ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे चोरीच्या मार्गावर वळालेल्या एका सराईत चोराला शांतिनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील बुराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ४ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि इतर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात राहणारे दीपक यादव हे गडचिरोली येथे नोकरीला असून, घटनेच्या वेळी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
तपासादरम्यान पोलिसांना स्वप्नील बुराडे याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्या निशाणदर्शकावरून चोरीस गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.
पोलिस तपासात आरोपीला नशा आणि ऑनलाइन जुगाराचे व्यसन असल्याचे समोर आले. ऑनलाइन जुगारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




