Published On : Sat, Aug 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कुख्यात आरोपीला तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह अटक

गुन्हे शाखा युनिट-५ची जरीपटका परिसरात मोठी कारवाई
Advertisement

नागपुरात कुख्यात आरोपीला तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह अटक

नागपूर : नागपुरात अवैध शस्त्रांविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट-५ने मोठी कारवाई केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिसांनी कुख्यात आरोपी आकाश राजन थापा याला तीन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. आरोपीकडून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले असून, एकूण सुमारे १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाला मेकोसाबाग येथील लेंडी मैदान परिसरात मातृछाया वाचनालयाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आकाश थापा याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून दोन मॅगझिनसह देशी कट्टे, आणखी एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने ही शस्त्रे त्याचा परिचित योगेश सिरिया आणि अभय यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील खंडवा येथील कथित शस्त्रविक्रेता आकाश भाई याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या शस्त्रांचा वापर एका कुख्यात गुन्हेगाराच्या साथीदारांना धमकावण्यासाठी केला जाणार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात आरोपी विशाल मेश्राम याची सुटका होत असताना त्याच्या साथीदारांना धमकावण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे ठेवण्यात आल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.

Advertisement

या प्रकरणात आकाश राजन थापासह योगेश सिरिया, अभय आणि खंडवा येथील कथित शस्त्रविक्रेता आकाश भाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून शस्त्रांचा स्रोत आणि या प्रकरणामागील गुन्हेगारी साखळीचा अधिक तपास सुरू आहे.
नागपुरात कुख्यात आरोपीला तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह अटक

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.