नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताची ओळख ४३ वर्षीय सुधीर महेंद्र राजभान द्विवेदी अशी पटली आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजता राजीव नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुधीर द्विवेदी यांना मद्यपानाचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली असावी, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यासह अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.





