
नागपूर : कौटुंबिक वादाचा राग एका व्यक्तीने १४ वर्षीय मुलावर काढल्याची धक्कादायक घटना नंदनवन परिसरात घडली. आरोपीने मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांना फोनवरून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार मिळताच गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत आरोपीला एनआयटी उद्यान परिसरातून अटक केली. मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सिद्धार्थ अरुण पिल्लेवान (रा. शास्त्रीनगर, नंदनवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचा पत्नीशी वाद झाला होता. या वादात मारहाण झाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी आरोपीच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि सिद्धार्थला वाद न करण्याचा सल्ला दिला. याच रागातून आरोपीने १४ वर्षीय मुलाला बहाण्याने घराबाहेर नेले.
यानंतर आरोपी मुलाला घेऊन एनआयटी उद्यान परिसरात पोहोचला. तेथून त्याने मुलाच्या वडिलांना फोन करून पत्नीला तातडीने घरी घेऊन येण्यास सांगितले. अन्यथा मुलाचे वाईट होईल, अशी धमकी दिली.
तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे ठिकाण एनआयटी उद्यान परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सिद्धार्थला अटक केली. त्याच्याकडील दुचाकीही जप्त करण्यात आली.
अवघ्या तीन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. मुलगा सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलिस करीत आहेत.




