
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आदासा गणेश मंदिराला ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत हा दर्जा देण्यात आला आहे. या निणर्यामुळे आदासा येथील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय ८ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आला. आदासा गणेश मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद, नागपूरच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. राज्य निकष समितीच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. शासन निर्णयातील निकषांनुसार प्रस्ताव परिपूर्ण असल्याचे आढळून आल्यानंतर आदासा येथील गणेश मंदिरास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली.
आदासा गणेश मंदिर हे नागपूर जिल्ह्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र असून, ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आदासा गणेश मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे ही नागपूर जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आदासा हे विदर्भातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, या दर्जामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकास आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. आदासा गणेश मंदिराचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि व्यापक स्वरूपात करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या निर्णयासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे आदासा गणेश मंदिराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मदत होणार आहे. यात्रेकरू आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, पायाभूत सुविधा तसेच परिसराच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या संधींच्या दृष्टीने या निर्णयाला विशेष महत्त्व आहे. भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि आदासाची ओळख राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून अधिक भक्कम व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.




