
नागपूर : गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीमच्या वाढत्या वापराविरोधात नागपुरात सुरू असलेल्या चर्चेला आता गणेश मंडळांकडूनही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील तब्बल १३६ गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील हमीपत्रे सादर केल्याची माहिती माजी विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी दिली.
डीजे आणि लेझर बीमच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी जोशी यांनी नागरिकांच्या सहभागातून जनचळवळ उभारण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात नागरिकांनी मूक मोर्चा काढत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध दर्शविला होता.
त्यानंतर मंगळवारी जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत १३६ गणेश मंडळांनी डीजे न वाजविण्याची भूमिका स्वीकारल्याची माहिती दिली. मंडळांनी स्वतःहून घेतलेला हा निर्णय आणि तरुणांचा सहभाग समाजासाठी सकारात्मक संदेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या यादीत दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मंडळांची संख्या लक्षणीय आहे. दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपूरमधील काही मंडळांनीही डीजेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या १३६ मंडळांचा सहभाग शहरातील सर्व सहाही मतदारसंघांमध्ये समान प्रमाणात असल्याचे दिसून येत नाही.
दरम्यान, डीजेबंदीच्या मुद्द्यावर भाजपमध्येही वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सरसकट डीजेबंदीला विरोध दर्शवत गणेशोत्सवातील पारंपरिक उत्साह आणि ध्वनिव्यवस्थेबाबत वेगळी भूमिका मांडली होती.




