नागपूर: उपराजधानीपासून जवळच असलेल्या मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष आढळले. आतापर्यंत जवळपास २ हजार ७६६ बुद्धकालीन मूर्ती उत्खननात सापडल्या. विशेष म्हणजे, मोठमोठ्या दगडाने तयार करण्यात आलेले तीन स्तूप आढळले. स्तूपातील छोट्याशा खोलीत डोके नसलेली मूर्ती तसेच अस्थी आढळल्या. ही मूर्ती व अस्थी नागार्जूनाच्या आहेत, अशी माहिती बौद्ध धम्मगुरू आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी दिली. इंदोरा बुद्ध विहार येथील निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही ऐतिहासिक माहिती दिली.
या टेकडीवर असलेल्या तलावाखाली उत्खनन केल्यास बौद्धकालीन स्तूप असल्याचा अंदाजही व्यक्त केला. आतापर्यंत झालेल्या उत्खननात बोधिसत्व व भिक्खू उभे असलेले सातवाहनकालीन चिन्हही मिळाले आहे. बोधिसत्व नागार्जून स्मारक संस्था व अनुसंधान केंद्रातर्फे १९९२ मध्ये उत्खननाला प्रारंभ झाला. मनसर टेकडीवर एकेकाळी बौद्धकालीन विद्यापीठ होते. येथे बौद्धकालीन अवशेष आहेत. त्यामुळे येथे उत्खनन करण्याची विनंती करणारे पत्र पुरातत्व विभागाला दिले होते. मात्र, त्यांना खरे वाटले नाही. त्यामुळे रामटेकचे तत्कालीन खासदार तेजसिंगराव भोसले व सांस्कृतिक मंत्री अर्जूनसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी उत्खननाला मंजुरी दिली.
पुरातत्व विभागाच्या चमूंनी उत्खनन केल्यानंतर स्व:खर्चाने उत्खनन केल्याचे ससाई म्हणाले. पहिल्यांदा झालेल्या उत्खननात टेकडीवर तीन स्तूप आढळले. स्तूपाच्या खाली महापुरुषाची अस्थी आणि त्याखाली बौद्धकालीन मूर्ती, सातवाहनकालीन शिलालेख मिळाले. दुसºयांदा झालेल्या उत्खननात बौद्ध विद्यापीठ आढळले. या विद्यापीठात बौद्ध भिक्खूंना धम्म आणि सदाचाराची शिकवण दिली जात होती. आणखी ५० फूट खोल उत्खनन केल्यास तथागतांची अस्थी मिळेल, असे पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी ए. के. शर्मा यांनी सांगितल्याचे ससाई म्हणाले. संपूर्ण उत्खनन जवळपास ९ वर्षे सुरू होते, असे ससाई म्हणाले.
कोण आहेत नागार्जून
तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर ५०० ते ६०० वर्षांनी नागार्जूनाचा जन्म झाला. ते आयुर्वेद आणि रसायनाचे जनक होते. त्यांनी महायान पंथाची स्थापना केली होती. आयुर्वेदाच्या अभ्यासामुळेच ते १५० वर्षांपर्यंत जगले, असे बोलले जाते. एका ऋषीने नागार्जूनामुळे काहीतरी विपरित होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी ८ ते १० वर्षांचे असताना गुहेत सोडले. त्यांचे बौद्ध भिक्खूंनी पालनपोषण केले. त्यानंतर नागार्जूनाने आयुर्वेद आणि रसायनाचा अभ्यास केला आणि ते रामटेक परिसरात स्थायिक झाले.
…अन् नागार्जूनाने मान कापली












