Published On : Sun, Aug 20th, 2017

परवाने प्राप्तीसाठी असलेल्या “एक खिडकी योजना”आणि नागपूर शहर पोलिसांचे गणेश मंडळाकडून स्वागत व कौतुक

नागपूर: गणेशोत्सव २०१७ व बकरी ईदनिमित्त नागपूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शांतता कमिटीचे सदस्य, स्वयंसेवी संघटना यांची बैठक दि. १८/०८/२०१७ रोजी मा.पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली रजवाडा पॅलेस, गणेशपेठ येथे दुपारी ४ वाजता पार पडली. सदर बैठकीस सह-पोलीस आयुक्त. श्री शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त. श्यामराव दिघावकर,शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, लोकप्रतिनिधी आमदार मा.किशोर गजभिये, गिरीश व्यास, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त. मा.रवींद्र कुंभारे, शहरातील १३०६ सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी व सर्व पो. स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.


बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त(विशेष शाखा). निलेश भरणे यांनी केले. त्यांनी संगणक सादरीकरणाद्वारे गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना ‘एक खिडकी योजने’ बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवान्यांसाठी करावी लागणारी धावपळ व गैरसोय टाळून आवश्यक परवाने सुलभरीत्या मिळावे, याकरिता मा.पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास व महापालिकेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून परवान्यांसाठी लागणारी सर्व सुविधा एका छताखाली मिळून देण्यासाठी ” एक खिडकी योजना ” सुरू करण्यात आली आहे.

एक खिडकी योजनेच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळांना परवाना मिळण्यासाठी संबधीत पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, विशेष शाखा व NMC चे पदाधिकारी शहरातील NMC झोन च्या शाखेत एकत्रितरित्या हजर राहणार आहेत व नागरिकांनी आपापल्या हद्दीत संबंधित असलेल्या NMC झोन कार्यालयात सर्व कागदपत्रे पूर्तता करून परवण्यासाठी अर्ज दाखल केल्यास त्या अर्जाची छाननी होऊन सर्व विभागाकडून त्याच ठिकाणी तात्काळ त्याच दिवशी NMC द्वारे परवानगी देण्यात येणार आहे. आतपर्यंत शहरातील ३० गणेश मंडळांनी परवानगी अर्ज दाखल केले असून त्यापैकी २२ गणेश मंडळांना परवाना देण्यात आला आहे, तरी गणेश मंडळांनी वेगवेगळ्या कार्यालयात परवानगीसाठी अर्ज न करता एक खिडकी योजनेतून एकाच ठिकाणी जाऊन आपला अर्ज लवकर दाखल करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त(विशेष शाखा). निलेश भरणे यांनी नागरिकांना केले आहे.

ही योजना दि.१७/०८/१७ पासून सुरू झाली आहे. पोलीस परवानगीसाठी आवश्यक असणारे वेगवेगळ्या अर्जाचे नमुने नागपूर शहर पोलिसांचे संकेतस्थळ www.nagpurpolice.gov.in वर तसेच “एक खिडकी झोन कार्यालयांमध्ये” देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, यात नागरिक नमुना अर्ज, मा.सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे मार्गदर्शक सूचना, इत्यादी संबंधित आदेश कायदे उपलब्ध आहेत तरी नागरिक ते वरील संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊ शकतात. तसेच महानगरपालिकेशी संबंधित विविध अर्जाचे नमुने NMC च्या www.nmc.nagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दैनंदिन घडामोडी व इतर बाबीसाठी नागरिकांनी वरील दोन्ही संकेतस्थळांना वारंवार भेट द्यावी.

तसेच पोलीस आयुक्त.(वाहतूक शाखा) श्री रविंद्रसिंग परदेशी यांनी सांगितले की, शहरात मेट्रोचे विविध ठिकाणी काम सुरू असून गणपती मूर्तीस्थापनेची मिरवणूक एक दिवस आधी काढून मूर्ती स्थापन केल्यास वाहतूकीची कोंडी टाळता येईल. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त. श्री रवींद्र कुंभारे यांनी गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करून पर्यावरणाची हानी टाळण्याचे तसेच ‘पीओपी’च्या मुर्त्यांऐवजी मातीच्या व इकोफ्रेंडली मूर्ती वापरण्याचे आवाहन केले.

पोलीस आयुक्त यांनी गणेशमंडळांच्या प्रश्न व अडचणींना उत्तरे दिली. याप्रसंगी अनेक गणेश मंडळ प्रतिनिधींनी आपले म्हणने मांडून ‘एक खिडकी योजने’ चे स्वागत केले, तसेच अनेक मुस्लिम बांधव सदर बैठकीत हजर होते. त्यांनी नागपूर शहरातील सामाजिक सलोखा व बंधुभाव प्रशंसनीय असल्याचे सांगून गणेशोत्सव व सर्व जातीधर्मांचे कार्यक्रम सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यास पोलिसांना मदत करण्याचे आश्वासन दिले.पोलीस आयुक्त यांनी इकोफ्रेंडली मूर्ती स्थापन करणाऱ्या गणेश मंडळाचे अभिनदंन केले व अश्या मंडळांना आपण भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मा. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचें पालन करावे असे आवाहन केले. तसेच जलप्रदूषणामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात, पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीमध्ये घातक रसायने वापरलेली असतात व ते घटक पाण्यात न विरघळल्याने मासे व इतर जलचर त्यांचे सेवन करतात व या जलचरांचे भक्षण केल्याने मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे मातीच्या मूर्ती वापरण्यात याव्यात असे आवाहन मा.पोलीस आयुक्तांनी केले. मा.किशोर गजभिये यांनी पोलिसांच्या एक खिडकी योजनेचे कौतुक करून आभार मानले. तसेच या योजनेत एसएनडीएल विभागाला समाविष्ट करण्याची सूचना केली. आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त राहुल माखनिकर यांनी केले. त्यामध्ये सर्व जातीधर्मानी एकत्रितरित्या उत्सव साजरे करावे, याकरिता विविध शेर आणि कवितांच्या माध्यमातून विचार मांडून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त. श्रीमती गलांडे मॅडम यांनी केले.