Published On : Mon, Feb 17th, 2020

‘माय हार्ट माय नागपूर’….आज उलगडणार रहस्य

महापौर संदीप जोशींचा अभिनव उपक्रम : विवेकानंद स्मारक येथे एकत्रित होणार तरुणाई

नागपूर: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पर्वावर नागपुरातील तरुणाईला आश्चर्याचा धक्का बसला. विवेकानंद स्मारक येथे ‘माय हार्ट माय नागपूर’ असे इंग्रजीत लिहिलेल्या शब्दांचा ‘सेल्फी पॉईंट’ बघून तरुणाई सुखावली आणि त्या दिवशी सोशल मीडियावर ते ट्रेंडिंग झाले.

मात्र हा केवळ सेल्फी पॉईंट नसून यामागे काहीतरी दडले आहे. नेमके ते काय, याची घोषणा सोमवारी (ता.१७) महापौर संदीप जोशी तरुणाईच्या उपस्थितीत करणार आहेत. महापौर संदीप जोशी यांच्या प्रत्येक उपक्रमात नवे आणि काहीतरी अभिनव दडलेले असते. आता अचानक उभ्या केलेल्या या सेल्फी पॉईंटमागे नेमके काय लपले आहे, याबाबतची उत्सुकता तरुणाईमध्ये शिगेला पोचली आहे.

अंबाझरी येथील विवेकानंद स्मारक येथे सोमवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बक्षिसांची लयलूटही यावेळी होणार आहे. ‘माय हार्ट माय नागपूर’ या सेल्फी पॉईंटमागील उत्सुकता संपविण्यासाठी नियोजित वेळी नागपूरकरांनी विवेकानंद स्मारक येथे यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.