Published On : Sat, Oct 3rd, 2020

माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षणात 641 कोरोनाबाधित रुग्णांची ओळख – रविंद्र ठाकरे

14 लाख 21 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण
आशा सेविकांनी शोधले 1 हजार 215 संक्षयीत
सर्वेक्षणासाठी 1 हजार 994 पथक
70.96 घरांना भेटी

नागपूर,: माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 लाख 48 हजार 870 घरांना भेट देवून सुमारे 14 लाख 21 हजार 113 व्यक्तींचे आरोग्य विषयक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 1 हजार 994 पथकाव्दारे सर्वेक्षणाचे काम सुरु असून या सर्वेक्षणामध्ये 641 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे तपासणी अंती सिध्द झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 70.96 टक्के घरांना भेटी देण्यात आल्या असून 64.63 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तपासणीसाठी घरी येणाऱ्या आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी तसेच सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या 1 हजार 994 पथकांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान उपयुक्त ठरत आहे.


या अभियानांतर्गत सारी व संक्षयीत कोरोनाबाधित 767 रुग्ण आढळून आले असून त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता 641 रुग्ण बाधीत निघाले. त्यासोबतच 15 हजार 629 व्यक्ती मधूमेह आजाराचे, 2 हजार 675 रुग्ण उच्च रक्तदाबाचे, 219 रुग्ण किडणी आजाराचे, 203 रुग्ण यकृताच्या आजाराचे तर 13 हजार 968 रुग्ण इतर व्याधिंनी बाधीत असल्याचे आढळून आले आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या 32 हजार 491 रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या तपासणीमध्ये कळमेश्वर तालुक्यात 95.74 टक्के, रामटके 90.15 टक्के, उमरेड 93.24 टक्के, भिवापूर 71.33 टक्के, कुही 75.77 टक्के, मौदा 79.23 टक्के, नरखेड 88.70 टक्के, सावनेर 63.86 टक्के, हिंगणा 63.98 टक्के, पारशिवनी 53 टक्के, कामठी 48 टक्के, काटोल 47.46 टक्के, नागपूर ग्रामीण 16 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या तपासणीमध्ये नरखेड तालुक्यात 130 संक्षयीतांची तपासणी केली असता 103 सारी आजाराचे तर 17 कोरोनाबाधित आढळले आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नागपूर ग्रामीण 42, कामठी 92, हिंगणा 64,काटोल 43, सावनेर 84, कळमेश्वर 95, रामटेक 17, पारशिवनी 57, मौदा 25, उमरेड 19, भिवापूर 46 तर कुही तालुक्यात 40 बाधीत रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

1 हजार 717 आशाव्दारे सर्वेक्षण
माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या पथकांमध्ये 1 हजार 717 आशा सर्वेक्षणाचे काम करीत असून त्यांच्या मदतीला 111 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत आशांची मुख्य जबाबदारी असून जिल्ह्यात सर्व आशा हे अभियान यशस्वीपणे राबवत आहे.

अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या आशांमध्ये नरखेड तालुक्यात 114, कुही 102, कळमेश्वर 99, नागपूर ग्रामीण 165, मौदा 123, भिवापूर 99, रामटेक 172, उमरेड 122, कामठी 124, काटोल 112, पारशिवनी 152, हिंगणा 164 तर सावनेर तालुक्यात 169 आशांव्दारे हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविद्र ठाकरे यांनी दिली.