Published On : Fri, Feb 7th, 2020

‘पब्लिक बाईक शेअरींग’साठी मनपा व काल्स्त्रू यांच्यात सामंजस्य करार

Advertisement

‘पब्लिक बाईक शेअरींग’साठी मनपा व काल्स्त्रू यांच्यात सामंजस्य करार

नागपूर : काल्स्त्रू शहरातील ‘वाहन विरहीत वाहतूक व्यवस्था’ (नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट सिस्टीम) अंतर्गत ‘पब्लिक बाईक सिस्टीम’ प्रकल्प नागपूर शहरात लागू करण्याबाबत मनपा व काल्स्त्रू यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. गुरुवारी (ता.६) नागपूर स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लिमीटेड चे सीईओ डॉ.रामनाथ सोनवणे व काल्स्त्रू शहराचे लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रो यांनी करारावर स्वाक्षरी केली.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी नागपूर शहराला भेट देणा-या काल्स्त्रू शहरातील सर्व मान्यरांचा सत्कार केला. काल्स्त्रू शहराचे लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रो, काल्स्त्रूचे इनोव्हेशन, नेटवर्क्स, इंटरनॅशनल रिलेशन अँड स्मार्टर सिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख रॉफ इचॉर्न, एक्सटर्नल रिलेशन अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग विभागप्रमुख डॉ.एबरहार्ड फिशर, इकॉनॉमी डेव्हलपमेंट विभागाचे संचालक मायकल कॅशर, अर्बन प्लॅनिंग विभाग प्रमुख डॉ. अँक हेलेन मेरी-लूइस कार्मन-वोसेनर, इकॉनॉमी डेव्हलपमेंट विभागप्रमुख डॉ. मार्टिन लुटेन्सचल्गेर, इंटरनॅशनल रिलेशन अँड इकॉनॉमी डेव्हलमपेंट विभागचे सायमन प्लिगर, ट्रॉन्सपोर्ट प्लॅनिंग विभागप्रमुख डॉ. जान बालथसर रील, बिल्डींग डिपार्टमेंटच्या अँट्ज स्कीअर या सर्वांचे महापौर संदीप जोशी यांनी स्मृतीचिन्ह नागपूर महापानगरपालिकेचा दुपट्टा देउन सत्कार केला.

याप्रसंगी स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ.रामनाथ सोनवणे, उपअभियंता राजेश दुफारे, आय.यू.सी.चे समन्वयक आशिष वर्मा, आशिष पंडीत, आय.यू.सी.चे वरिष्ठ विशेषज्ञ नीलभ सिंह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जर्मनीतील काल्स्त्रू शहरामध्ये वाहन विरहीत वाहतूक व्यवस्था लागू करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला होता. त्याअंतर्गत शहरात ‘पब्लिक बाईक शेअरींग सिस्टीम’ व्यवस्था लागू करण्यात आली. या संकल्पनेला काल्स्त्रू शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. नागरिकांच्या सुविधेसाठी उत्तम ठरलेली ‘पब्लिक बाईक सिस्टीम’ काल्स्त्रू शहरात यशस्वी ठरली आहे. ही प्रणाली नागपूर शहरात राबविण्यासाठी याबाबत मनपा व काल्स्त्रू शहरामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

करारा अंतर्गत काल्स्त्रू शहराद्वारे मनपाला सर्व तांत्रिक सहकार्य केले जाणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या विविध पद्धती तसेच धोरण तयार करण्याबाबत काल्स्त्रूचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. धोरणातील सुधारणा तसेच आवश्यक बाबी या सर्व लहान मोठ्या बाबींची माहिती तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे.

आज जगात सर्वत्र प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाहन विरहीत वाहतूक व्यवस्थेअंतर्गत जास्तीत जास्त लोकांनी ‘पब्लिक बाईक सिस्टीम’चा वापर केल्यास यामध्ये नक्की यश मिळू शकेल. पर्यावरणपूरक व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ‘पब्लिक बाईक सिस्टीम’ उपयुक्त ठरणार आहे.

दोन वर्षासाठी काल्स्त्रूचे तज्ज्ञ नागपूरात राहतील : डॉ. रामनाथ सोनवणे
काल्स्त्रू नागपूर शहराच्या तुलनेत क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने लहान आहे. मात्र लहान शहर असूनही विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास ते अत्यंत विकसीत शहर आहे. तेथील पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. त्यामुळे अशा शहरातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची शहराला गरज आहे. कराराच्या माध्यमातून लवकरात लवकर एका तज्ज्ञा व्यक्तींची निवड केली जाणार आहे. ती तज्ज्ञ व्यक्ती नागपूर शहरात दोन वर्षासाठी येउन मार्गदर्शन करेल, अशी माहिती नागपूर स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लिमीटेड चे सीईओ डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.