Published On : Fri, Feb 7th, 2020

वाहतूक बंद न करता करा ‘झिरो माईल’चा विकास

हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय : महामेट्रोच्या प्रस्तावावर केली सुनावणी

नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने झिरो माईल्स स्थळाचे विकास कामे करण्याकरिता झिरो माईल्स ते भारतीय विद्या भवन शाळेदरम्यान असलेल्या विद्यमान रस्त्याची जागा वगळून विकास कामे करावी, असा निर्णय हेरिटेज समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील सहायक संचालक (नगररचना) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. ७) हेरिटेज समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला हेरिटेज समितीचे सदस्य तथा निरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, सदस्य जया वाहने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद अशोक मोखा, सहायक संचालक नगररचना विभाग नागपूर शाखेच्या सुप्रिया थूल, महामेट्रोचे एजीएम संदीप बापट, वाहतूक विभागाचे उपायुक्त यांचे प्रतिनिधी वाहतुक निरिक्षक जयेश भांडारकर उपस्थित होते.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे झिरो माईल्स मेट्रो स्टेशनला लागून असलेल्या झिरो माईल परिसरात १५१४१.४४४ चौ.मी. जमिनीवर हेरिटेज वॉक तयार करण्याचा प्रस्ताव होता. या हेरिटेज स्थळाच्या विकासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ला झिरो माईल स्थळाच्या विकासाबाबत प्रेझेंटेशन तयार करून हेरिटेज संवर्धन समितीला सादर करावे व हेरिटेज संवर्धन समितीने या प्रकरणात निर्णय घेऊन त्याप्रमाणे उच्च न्यायालयात १३ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महामेट्रोतर्फे ६ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित बैठकीत हेरिटेज संवर्धन समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. यात महामेट्रोने झिरो माईल स्थळालगतच्या दक्षिणेकडील भागातील झिरो माईल व गोवारी स्मारकामधील विद्यमान रस्त्याची जागा हेरिटेज वॉक या प्रस्तावित कामाचा अंतर्भाव केल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रस्तावित कामात रस्त्याची जागा अंतर्भूत न करता किंवा रस्त्याचे स्थलांतरण न करता विद्यमान रस्ता कायम ठेवून सुधारीत आराखडा सादर करण्याच निर्णय घेण्यात आला.

यानंतर महामेट्रोने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीत दोन प्रस्ताव सादर केले. पहिल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने झिरो माईल स्थळाचा विकास करण्याकरिता सादर केलेल्या नकाशात झिरो माईल्स ते भारतीय विद्या भवन शाळेदरम्यान असलेल्या विद्यमान रस्त्याची जागा प्रस्तावात अंतर्भूत करून व गोवारी शहीद स्मारकाला जोडून विकासकामे प्रस्तावित केली आहेत. तर दुसऱ्या प्रस्तावात झिरो माईल ते भारतीय विद्या भवन शाळेदरम्यान असलेल्या विद्यमान रस्त्याची जागा वगळून विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत.

यावर वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्तांनी पहिल्या प्रस्तावानुसार कार्य झाल्यास वाहतुकीची मोठी कोंडी होईल, वाहतूक विस्कळीत होईल त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करू नये, असे सुचविले होते. त्यामुळे सदर बैठकीत दुसऱ्या प्रस्तावानुसार कामास मंजुरी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.

यानंतरही महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) यांनी पहिल्या प्रस्तावानुसारच कामाला मंजुरी देण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने आज (ता. ७) झालेल्या बैठकीत वाहतूक पोलिस उपायुक्तांचे प्रतिनिधी यांनी झिरो माईल परिसरात येणारे मोर्चे, होणारे कार्यक्रम आणि त्यामुळे वळविण्यात येणाऱ्या वाहतुकीचा भार याविषयी मत मांडले. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत रस्ता बंद करणे, वाहतूक वळविणे हे योग्य होणार नसल्याचे मत मांडले. त्यामुळे हेरिटेज संवर्धन समितीने महामेट्रोच्या पहिल्या प्रस्तावाला नकार देऊन दुसऱ्या प्रस्तावानुसारच काम करण्याचा निर्णय घेतला.