Published On : Wed, Jul 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये लग्न समारंभात युवकाचा खून; ९ आरोपींविरोधात मोक्का कारवाई, मुख्य आरोपीला अटक

नागपूर : शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्न समारंभात झालेल्या हल्ल्यात युवकाचा खून झाल्याची गंभीर घटना २० फेब्रुवारी २०२५ रोजी समोर आली होती.विहांग मनिष रंगारी (वय २३)  असे मृत युवकाचे नाव आहे.या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण ९ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी बिरजू दीपक वाढवे यास अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

घटनेचा तपशील –
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, २० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन समोरील बिलगाव भागात फिर्यादीच्या बहिणीच्या लग्नाचा समारंभ सुरू असताना, आरोपी बिरजू वाढवे याने आपल्या साथीदारांसह त्या ठिकाणी हजेरी लावली. एका बाजूने प्रेमात असलेल्या बहिणीच्या लग्नावर नाराज होऊन, त्याने समारंभात येणाऱ्या पाहुण्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फिर्यादीचा मित्र विहांग मनिष रंगारी (वय २३) याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने विहांगवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपी आर्यन उईके याने सिमेंटचा ब्लॉक विहांगच्या छातीवर फेकला. अन्य आरोपींनी देखील विहांगवर हल्ला करून फिर्यादीस शिवीगाळ केली.

गंभीर जखमी अवस्थेत विहांग रंगारी यास उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलीस तपास आणि अटकेची कारवाई –
या घटनेनंतर यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्यात एकूण ९ आरोपींचा समावेश असून, त्यापैकी ८ जणांना २२ व २४ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. एका विधी संघर्षग्रस्त बालकास देखील ताब्यात घेण्यात आले होते.

तपासात या आरोपींनी संघटित टोळी तयार करून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक फायदा व वर्चस्वासाठी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केल्यामुळे आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य आरोपीचा पाठपुरावा –
घटनेनंतर फरार झालेला मुख्य आरोपी बिरजू दीपक वाढवे हा वारंवार आपला ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिसांनी तांत्रिक पद्धतींचा वापर करत गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन अखेर त्याला अटक केली.

पोलीस दलाचे उल्लेखनीय योगदान –
या कारवाईत मा. पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे, गुन्हे निरीक्षक सुहास राऊत, पो.उपनिरीक्षक सदाशिव कणसे, अमोल राठोड, तसेच पोलिस कर्मचारी गणेश गुप्ता, किशोर देवागण, प्रशांत कोडापे, प्रशांत लांजेवार, सन्नी मतेल, रोहित रामटेके, रितेश दुधे, अमोल भेंडेकर, राहुल शेट्टी, नितेश मिश्रा यांचा मोलाचा सहभाग राहिला.

Advertisement
Advertisement