Published On : Fri, Apr 3rd, 2020

नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने तयार केले वेब ॲप्लिकेशन

Advertisement

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : झोननिहाय सुरू असलेल्या दुकानांची यादी उपलब्ध

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक वस्तू मिळावा यासाठी नागपूर महानगरपालिका संपूर्ण प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक वस्तूंची कोणती दुकाने सुरू आहेत, याची माहिती मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून नागपूर महानगरपालिकेने वेब ॲप्लिकेशन तयार केले असून यामाध्यमातून आता त्यांना घराजवळील परिसरातील सुरू असलेल्या दुकानांची माहिती उपलब्ध होणार आहे.

किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, औषधी आदींची दुकाने अत्यावश्यक गरजांमध्ये मोडतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळची सुरु असलेली दुकाने, सुपर मार्केट याची माहिती व्हावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमधील अत्यावश्यक दुकानांची यादी मोबाईल क्रमांक आणि लोकेशनसह आहे. ही ॲप्लिकेशन उघडल्यानंतर नागरिकांना त्यांना हवे असलेल्या दुकानाची कॅटेगिरी सिलेक्ट करायची आहे. यानंतर झोन सिलेक्ट करायचा आहे. झोन सिलेक्ट केल्यानंतर किराणा दुकान अथवा सुपर मार्केट अथवा दुधाची दुकाने यापैकी एक सिलेक्ट करावे लागेल. या क्रमानुसार सिलेक्ट केल्यानंतर नागरिकांना हवी असलेली माहिती ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

सदर ॲप्लिकेशन नागरिकांच्या सोयीसाठी http://covidcarenagpur.cdaat.in या लिंक वर क्लिक करून सदर ॲप्लिकेशन उघडता येईल. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.