Published On : Mon, Nov 25th, 2019

१ डिसेंबरपासून मनपा घेणार नाही मिश्रीत कचरा : वीरेंद्र कुकरेजा

Virendra Kukreja

नागपूर: नागपूर शहरातील कचरा संकलन व्यवस्था हळूहळू सुरळीत होऊ लागली आहे. नव्या दोन कंपनीने कचरा संकलनाची व्यवस्था सांभाळल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र आता व्यवस्थेत बरीच सुधारणा झाली आहे, अशी माहिती देत आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी १ डिसेंबरपासून नागरिकांकडून मिश्रीत कचरा स्वीकारला जाणार नाही, असेही सांगितले.

यासंदर्भात बोलताना आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने १ डिसेंबरपासून ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा संकलनासाठी येणारे स्वच्छता दूत मिश्रीत कचरा घेणार नाही. ते म्हणाले, कचरा संकलनासाठी नेमण्यात आलेल्या ए.जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांकडे जुन्या कंपनीपेक्षा अधिक प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कनक कंपनीकडे केवळ २१० वाहने होती. नव्या कंपन्यांकडे एकूण ४५० वाहने आहेत. कनकचे कर्मचारी दिवसातून दोन वेळा कचरा उचलत होते तर नव्या कंपनीचे कर्मचारी चार वेळा कचऱ्याची उचल करतात. कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमध्ये उत्तम ध्वनिक्षेपक यंत्रणा आहे. त्यावर एक गाणं वाजतं.

Advertisement

या गाण्यातून नागरिकांना स्वच्छतादूत आल्याची सूचना मिळते. व्यासायिक परिसरात रात्री कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. हॉटेल्समधून रात्री निघणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरित कचरा संकलन करण्यासाठी प्रत्येकी दोन झोनमध्ये एक गाडी उपलब्ध आहे. मृत जनावरांना उचलण्यासाठीही प्रत्येक झोनमध्ये एक विशेष गाडी आहे. चिकन व मटनचा कचरा उचलण्यासाठीसुद्धा प्रत्येक झोनला विशेष गाडी देण्यात आली आहे. आठवडी बाजार आणि हॉकर्स झोनमधील कचरा उचलण्याचीही विशेष व्यवस्था आहे.

Advertisement

सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले की मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह ते दररोज सकाळी झोन कार्यालयात समीक्षा बैठक घेत आहेत. परिसराचा दौराही करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांसोबत सायंकाळी झोनल स्तरावर बैठक घेतली जात आहे. नागपुरात दररोज १२०० टन कचरा निर्माण होतो. यामध्ये घरातून संकलित होणारा कचरा १०५० टन आहे तर १५० टन कचरा निर्माण कार्यातून निघतो.

महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आपआपल्या प्रभागात दौरा करून ओला आणि सुखा कचरा देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत. जनजागृती करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रभागांची जबाबदारी देण्यात आली असून कचरा संकलन व्यवस्थेवर ते नियंत्रण ठेवत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूर शहराचे नाव देशातील मुख्य स्वच्छ शहरांमध्ये घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement