Published On : Mon, Apr 13th, 2020

मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षांना केले निलंबित

Advertisement

– शिक्षकांसाठी मागितली सुरक्षा किट ः आयुक्तांनी दिले निलंबनाचे पत्र

नागपूर: करोनाचा सर्वे करणाऱ्या शिक्षकांना सुरक्षा किट देण्यात यावी अशी मागणी केल्याने महापालिका आयुक्तांनी मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून आश्‍चर्यसुद्धा व्यक्त केले जात आहे.

महापालिका आयुक्त तुकराम मुंढे यांनी सर्व शिक्षकांना करोनाच्या सर्वेसाच्या कामाला लावले आहे. मात्र शिक्षकांना करोनाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याचे पत्र द्यावे, त्यांना सुरक्षा किट प्रदान करावी, केंद्र सरकरप्रमाणे प्रत्येकाचा विमा काढण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केली होती. या संदर्भात लक्ष्मीनगर झोनमध्ये बैठकसुद्धा झाली होती. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी याची दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. याच बैठकीत महापौरांनी मधुमेह, रक्तदाब असलेल्या तसेच वयाची पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वेतून मोकळे करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आयुक्त नाराज झाले होते. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नेत्याला बघून घेऊ असेही त्यांनी सुतोवाच केले होते.

रविवारी (ता.12एप्रिल) सुटीच्या दिवशी राजेश गवरे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. व्हॉट्‌ऍपवरून निलंबानाचे आदेशही गवरे यांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त तुकराम मुंढे कुठल्याचा प्रस्ताव व मागणीला दाद देत नसल्याने त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन महापौर संदीप जोशी तसेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले होते. ही बाब त्यांना रुचली नसल्याने मुंढे यांनी निलंबित करून आपला राग काढल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. अध्यक्षांच्या निलंबनामुळे संतापलेले शिक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक शिक्षक म्हणून सर्वेचे काम महापालिकेने आपणाकडे दिले होते. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे आपले कर्तव्य बजावले. शिक्षक संघाचा अध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहचवणे आपले कर्तव्य आहे. करोनासाराखा जीवघेण्या आजारात सर्वेक्षण करताना शिक्षकांना सुरक्षा किट पुरवण्याची मागणी करण्यात काय गैर आहे?