Published On : Sat, Jan 11th, 2020

मनपाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे विक्रम ग्वालबंसी विजयी

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका प्रभाग क्र. १२ (ड) च्या रिक्त जागेसाठी गुरुवारी (ता. ९) पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे विक्रम जगदीश ग्वालबसीं यांचा विक्रमी मताधिक्क्याने विजय झाला.

विक्रम जगदीश ग्वालबंसी यांना १३३८६ मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार यांना ३७५० मते प्राप्त झालीत. भाजपचे विक्रम ग्वालबंसी यांचा ९६३६ मताधिक्क्याने विजय झाला. अन्य उमेदवारांमध्ये अपक्ष अशोक देवराव डोर्लीकर यांना २६१७, भारिप बहुजन महासंघाचे १५५६, आम आदमी पार्टीचे आकाश सुरेश कावळे यांना ६९० प्राप्त झाली. १५२ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. एकूण २२१५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मतमोजणी नागपूर महानगरपालिकेचे धरमपेठ झोन क्र. २ कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. भाजपचे जगदीश ग्वालबंसी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. अंतिम फेरीनंतर भाजपचे विक्रम जगदीश ग्वालबंसी हे विजयी झाल्याचे मनपा उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांनी जाहीर केले. यावेळी सहायक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी प्रकाश वऱ्हाडे हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांनी विजयी उमेदवार विक्रम ग्वालबंसी यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, माजी सभापती प्रमोद कौरती यांची उपस्थिती होती.

वडिलांनी सुरू केलेली कामे पूर्ण करणार : विक्रम ग्वालबंसी

प्रभाग क्र. १२ (ड)चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रम ग्वालबंसी हे दिवंगत नगरसेवक जगदीश ग्वालबंसी यांचे पुत्र आहेत. त्यांच्या मातोश्री अरुणा ग्वालबंसी ह्यासुद्धा यापूर्वी नगरसेवक होत्या. विक्रम ग्वालबंसी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्रीपद भूषविले आहे. सध्या ते भाजयुमोचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ३३ वर्ष वय असलेले विक्रम ग्वालबंसी हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत.

आपल्याला मतदारसंघातील सर्वच समुदायातील मतदारांनी कौल दिला आहे. दिवंगत वडिलांनी नगरसेवक म्हणून प्रभागात सुरू केलेली कामे पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असून प्रभाग विकासाचे त्यांचे स्वप्न आपण आपल्या कार्यकाळात पूर्ण करु, अशी ग्वाही त्यांनी विजयानंतर बोलताना दिली.