Published On : Sat, Jan 11th, 2020

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी केली सीमेंट रोड कामाची पाहणी

नागपूर: शहरातील विविध भागामध्ये सुरू असलेल्या सीमेंट रोड व फुटपाथ दुरूस्ती कामाची शुक्रवारी (ता.१०) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, उपअभियंता जी.सी. श्रीवास्तव, स्थायी समिती सभापतींचे विशेष कार्य अधिकारी प्रफुल्ल फरकासे, जे.पी. एंटरप्राइजेसचे निखील सिंह, लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींगचे मनोज सिंह आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्थायी समिती सभापतींनी शंकर नगर येथे लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींगमार्फत सुरू असलेल्या फुटपाथ दुरुस्ती कार्याची पाहणी केली. शंकर ते बजाज नगर मार्गावर सीमेंट रोडचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील फुटपाथची दुरूस्ती करून नागरिकांना चालण्यासाठी सोयीचे फुटपाथ निर्मीत करण्यात यावी. कामामध्ये येणारे अडथळे तातडीने दुर करावे. तसेच परिसरातील काही नागरीकांनी घराच्या गेटपुढे फुटपाथवर केलेले बांधकाम तातडीने काढून कामाला गती देण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी यावेळी दिले.

यानंतर अजनी चौक ते चुनाभट्टी रोडवरील फुटपाथ दुरूस्ती कामाची स्थायी समिती सभापतींनी पाहणी केली. सदर मार्गावरील फुटपाथ दुरूस्तीचे काम जे.पी. एंटरप्राइजेस मार्फत सुरू आहे. या मार्गावरील फुटपाथवर काही ठिकाणी मोठे पाईप ठेवले असून ते तातडीने हटविणे. याशिवाय इतर अडथळे त्वरून दूर करून निर्धारित वेळेमध्ये काम पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

शहरामध्ये जे.पी. एंटरप्राइजेस मार्फत सावरकर नगर ते अजनी चौक ते चुनाभट्टी रोड ते अजनी रेल्वे उड्डाण पूल, तिरंगा चौक ते सक्करदरा चौक, ग्रेट नाग रोड अशोक रोड ते जगनाडे चौक या मार्गांवरील काम सुरू आहे. तर ज्योती स्कूल ते दिघोरी उड्डाण पूल (बी), ईश्वर नगर चौक ते शिवशंकर लॉन खरबी रोड, नंदनवन सीमेंट रोड ते ग्रेट नाग रोड (तिरंगा चौक मार्गे), लोकांची शाळा ते उमरेड रोड, ग्रेट नाग रोड धंतोली आरओबी ते अशोक चौक, लोकांची शाळा ते सीपी अँड बेरार कॉलेज चौक, बस स्थानक ते मॉडेल मिल चौक या मार्गावरील काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जे.पी. एंटरप्राइजेसचे निखील सिंह यांनी दिली.

लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींग मार्फत शंकर नगर चौक ते बजाज नगर चौक दरम्यानचे काम सुरू झाले आहे. तर सेंट्रल बाजार रोड व्‍हीएनआयटी ते लोकमत भवन चौक, पार्क रोड दक्षिण अंबाझरी रोड ते उत्तर अंबाझरी रोड, राम नगर चौक ते रवी नगर चौक या मार्गावरील काम सुरू व्हायचे असून ते लवकरच सुरू केले जातील, अशी माहिती लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींगचे मनोज सिंह यांनी दिली.