Published On : Tue, Aug 20th, 2019

शाडू व शेणाच्या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी मनपा देणार नि:शुल्क जागा

Advertisement

गणेशोत्सवासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेत स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळाची बैठक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींबाबत न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे. याशिवाय शाडू व शेणाच्या मूर्त्या नागरिकांना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तुरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्तींच्या विक्रेत्यांना नि:शुल्क जागा देण्यात येईल, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शहरातील गणेश मंडळ व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची मंगळवारी (ता.२०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आमदार प्रा. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, नगरसेवक मोहम्मद जमाल, नगरसेविका विद्या कन्हेरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपा आरोग्य उपसंचालिका डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना आणि संकल्पना मांडल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी नागरिकांनी मातीच्या मूर्तींचीच स्थापना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय निर्माल्य तलावामध्ये विसर्जीत न करता मनपा व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडे ते देण्याचे आवाहन करण्यात आले. गणपती मंडळांच्या परवानगीसाठी यावर्षीही झोनस्तरावर सुविधा करण्यात येणार असून लवकरच ही सुविधा मंडळांसाठी सुरू करण्यात येणार आहे. गणेश मंडळांकडून परवानगीसाठी वसुल करण्यात येणा-या शुल्काची रक्कम कमी करण्याची मागणी यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली. यावर दखल महापौर नंदा जिचकार यांनी याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, शहरातील पर्यावरणपूरक गणेशेत्सव साजरा करण्यामध्ये स्वयंसेवी संस्था महत्वाची भूमिका बजावतात. मनपा आणि नागरिकांमध्ये महत्वाचा दुवा म्हणून स्वयंसेवी संस्था कार्य करतात. कोणत्याही समाजोपयोगी गोष्टीचे यश समाजाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही सुद्धा अशीच बाब आहे व यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळेच नागपूरने नाव मिळविले आहे. आत कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जनाच्या बाबतीत नागपूर महानगरपालिका अग्रेसर आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व रक्षण करण्यासाठी यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्थांसह गणपती मंडळांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गणेश विसर्जन ठिकाणी दिवसभर स्वच्छता राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्थेसह सुरळीत वाहतूक राहावी यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले. लोकांच्या भावना लक्षात घेता पीओपी मूर्तींबाबत न्यायालयाच्या दिशानिर्देशाचे पालन व्हावे यासाठी मनपातर्फे प्रयत्न करण्यात येत असून शांततापूर्ण वातावरणामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी ग्रीन व्हीजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तींच्या दुष्परिणामाची माहिती दिली. पीओपी व निर्माल्य विसर्जनामुळे तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे बरीच वर्ष ती तलावात तशीच राहते. याशिवाय तलावात मूर्ती विसर्जन केल्याने तलावाची खोली सुद्धा कमी होते. पीओपी मूर्ती मध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगामध्ये जड धातू असते. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व इतर सहकार्यासाठी ग्रीन व्हीजील यंदाही मनपाच्या सोबत आहे, असे ते म्हणाले. नियमानुसार पीओपी विक्री करणाऱ्यांनी त्यासंदर्भातील नियमांचे फलक लावणे आवश्यक आहे. मूर्तीमागे लाल खूण करणेही आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांनी केले तर आभार आरोग्य उपसंचालिका डॉ. भावना सोनकुसळे यांनी मानले.

पाण्याबाबत जनजागृती करणा-या देखाव्यांना मिळणार पुरस्कार
शहरातील विविध गणेश मंडळांकडून दरवर्षी विविध देखावे तयार केले जातात. यावर्षी शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे शहरात नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी यावर्षी गणेश मंडळांनी पाणी बचत, रेन वाटर हार्वेस्टिंग, लहान मुलांना पाण्याचे महत्व कळणारे देखावे, पर्यावरण संरक्षण, भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी करावयाची उपाययोजना आदी विषयांवर जनजागृती करणारे देखावे तयार करण्याची संकल्पना यावेळी जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मांडली. उत्कृष्ट देखाव्यांना मनपातर्फे पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement