Published On : Tue, Aug 20th, 2019

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किंमतीच्या सायकलींचे वाटप

Advertisement

मनपाची सायकल बँक योजना : शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांचा पुढाकार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सायकल बँक योजनेंतर्गत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.२०) मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किंमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव होते. मंचावर सत्तापक्ष नेते व महाराष्ट्र राज्य लघु विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह माजी महापौर प्रवीण दटके, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती उपसभापती मनिषा कोठे, शिक्षण समिती सदस्या रिता मुळे, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, स्वेटर, जोडे आदी साहित्य प्रदान करण्यात येतात. आता सायकल प्रदान करुन सुविधेमध्ये भर घालण्यात आली आहे. मनपामध्ये आधी शिक्षण विभागाकडे नेहमी दुर्लक्ष केले जायचे. मात्र मागील दोन वर्षात शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी पुढाकार घेउन आयुक्त राम जोशी यांच्या सहकार्याने मनपा शाळा व विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे काम केले आहे. मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बरी नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे कार्य विभागाकडून केले जात आहे, ही स्तुत्य बाब आहे. या योजनांचा लाभ घेताना विद्यार्थ्यांनीही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करावा. शिक्षण हे मोठे शस्त्र आहे त्याचा योग्य लाभ घेउन मेहनतीच्या बळावर आई-वडीलांना परिस्थितीमधून बाहेर काढा, असे आवाहन प्रतिपादन मनपातील सत्तापक्ष नेते व महाराष्ट्र राज्य लघु विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी अनेक व्यक्तींचे उदाहरण देउन इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर मोठे झालेल्या जगप्रसिद्ध व्यक्तींची गोष्ट सांगितली.

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव म्हणाले, मनपा शाळा आणि तेथील विद्यार्थी यांच्याकडे कधीही लक्ष देण्यात आले नाही. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कोणत्या योजनाही राबविण्यात आल्या नाही. मात्र आताच्या घडीला शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी ही समज खोडून काढली. शहरातील नागरिकांना मिळणा-या भौतिक सुविधांसह मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ही बाब लक्षात घेउन त्यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मनपातील विद्यार्थ्यांना कधीही न मिळणा-या सुविधा आता मिळू लागल्या आहेत, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द : प्रा.दिलीप दिवे
प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी योजनेची पार्श्वभूमी विषद केली. मनपा शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी त्रास होउ नये यासाठी मनपातर्फे बसची मोफत पास देण्यात आली. मात्र अनेक भागात, वस्त्यांमध्ये बसची सुविधा नसल्याचे किंवा बसस्थानकापर्यंत जायलाही मोठे अंतर पार करावे लागत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या अडचणीवर उपाय म्हणून त्यांना सायकल वितरीत करण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त २६० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरीत करण्यात आल्या. मनपाच्या सायकल बँक योजनेमधून १० लाख रुपयांच्या २८१ मोफत सायकलींचे यावर्षी वाटप करण्यात येत आहेत. मनपाची ही योजना दरवर्षी सुरू राहणार आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर राहू नये यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असेही शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.

शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी कार्य करा : राम जोशी
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी विविध योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महत्वाचे कार्य होणे आवश्यक आहे. यासाठी इयत्ता आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. त्यामुळे यावर्षी मनपा शाळांमधील दहावीच्या किमान पाच विद्यार्थ्यांचा निकाल ९० टक्क्यांच्या वर असावा व आठवी ते नववीच्या किमान पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरावीत अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.

दहा विद्यार्थ्यांना सायकल प्रदान
मनपाच्या सायकल बँक योजनेंतर्गत मंगळवारी (ता.२०) मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या आठ शाळांमधील दहा विद्यार्थ्यांना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या. लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेतील अतुल करंडे, वाल्मिकी नगर हिंदी हायस्कूलमधील संजना ठाकुर, विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेतील रीना साहु, पूजा साहु व नंदिनी चौरसिया, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील वैभव शुक्ला, जी.एम.बनातवाला इंग्लिश हायस्कूलमधील जोहेर आदिल, नेताजी मार्केट माध्यमिक शाळेतील विकाश शर्मा, कपील नगर हायस्कूलमधील आसीम खान, शिवणगाव माध्यमिक शाळेतील हर्षल हिवराळे या विद्यार्थ्यांना यावेळी सायकल वाटप करण्यात आल्या.