Published On : Thu, Sep 5th, 2019

खेडीकरांना 6 भूखंड मनपा देणार : पालकमंत्री

Advertisement

खाजगी भूखंडांवर नासुप्रने बांधले उद्यान

नागपूर: मौजा वाठोडा येथील रंजना सुरेख खेडीकर यांचे 6 भूखंड आणि खुल्या जागेवर नासुप्रने 10 वर्षापूर्वी उद्यान बांधले. या भूखंडासंदर्भातील सर्व कागदपत्रे खेडीकर यांच्याकडे आहेत. तसेच उद्यान बांधत असताना खेडीकर यांनी आक्षेपही घेतला होता. पण नासुप्रने त्याकडे दुर्लक्ष केले होते, याकडे आ. खोपडे यांनी लक्ष वेधले.

आता उद्यान तोडता येत नाही. खेडीकर कुटुंबाला त्यांच्या सहा भूखंडांबद्दल दुसरीकडे भूखंड द्यावे किंवा पैसे द्यावे अशी मागणी समोर आली. गुंठेवारी कायद्यानुसार त्यांनी हे भूखंड नियमितीकरण केले आहे. पण उद्यान बांधताना नासुप्रने साधी विचारणाही त्यांना केली नाही. आता नासुप्र अस्तित्वात नाही. त्यामुळे सहा महिन्यात महापालिका नासुप्रच्या मालकीच्या जागा हस्तांतरण करेल तेव्हा खेडीकरांना 6 भूखंड देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मौजा नारी खसरा नं. 135/1 नागभूमी गृहनिर्माण संस्था या अभिन्यासातील विद्युत विभागाचे आरक्षण रद्द करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यात विद्युत विभागाला आरक्षण देण्याचे या बैठकीत ठरले.

वर्धमाननगरातील मॉलचे प्रक़रण
वर्धमाननगर वैष्णव देवी चौक नासुप्र मॉलचा ढाचा 18 वर्षापासून तयार आहे. तीन ते चार मजली ढाचा आहे. यावर 7 कोटी रुपये खर्च झाला आहे. तेथे कोणताही प्रकल्प नाही. पण नंतर निधी न मिळाल्यामुळे या जागेचे काहीच होऊ शकले नाही. या मॉलच्या विकास करण्यासाठ़ी मनपाने प्रस्ताव तयार करावा त्यासाठी शासनाकडून निधीची मागणी करू, असे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

भरतवाडा विटाभट्टी
भरतवाडा येथील विटाभट्टी उद्योजकांना कोराडी येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. 420 लोकांची यादी कोराडी मुख्य अभियंत्यांच्या स्वाधीन करण्यात आली. शासनाच्या राख धोरणानुसार अ‍ॅश बंडजवळ असलेल्या जागेचे पट्टे या उद्योजकांना द्या. एका उद्योजकाला 600 चौ. मीटरचा भूखंड देण्यात येणार आहे.

पूर्व नागपुरातील भवानी मंदिर, मुरलीधर मंदिर, गणेश मंदिर या क वर्ग तीर्थक्षेत्रांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मनपाने तयार करावा व जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या तीनही तीर्थक्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

संत जगनाडे महाराज नंदनवन येथील शासनाने दिलेल्या बांधकामाबाबत 1 कोटी रुपये निधी संदर्भात पुढील कारवाईचा आढवा घेण्यात आला. तसेच पूर्व नागपुरातील आयपीडीएसच्या कामासंदर्भात एक बुकलेट तयार करा. कोणती कामे करणार ते आमदारांना दाखवा, त्यांच्यासोबत दौरा करा आणि एसएनडीएलने जी कामे केली नाही, ती करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरणला दिले.