नागपूर : नागपूरच्या खामला परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले बहुपरिचित खामला मार्केट हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या मार्केटच्या जागेवर आता ‘लंडन स्ट्रीट’ प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यासाठी ही जागा नागपूर महानगरपालिकेने एका नामवंत बिल्डरला विकल्याची माहिती पुढे आली आहे. ‘नागपूर टुडे’ ने या संपूर्ण घटनेवर प्रकाश टाकला.
नागरिकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणारे मार्केट –
खामला मार्केट हे परिसरातील नागरिकांसाठी दैनंदिन गरजांची पूर्तता करणारे महत्त्वाचे केंद्र होते. येथे भाजीपाला, फळं, अंडी, मटण, कोंबडी यासारख्या वस्तू सहज उपलब्ध होत असत. सहकार नगर, सोनगाव, जयप्रकाश नगर, खामला अशा अनेक भागांतील नागरिक या बाजारावर अवलंबून होते.
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी –
नागरिकांचे म्हणणे आहे की, लंडन स्ट्रीट प्रकल्पाच्या नावाखाली या मार्केटची बलिदान देण्यात आली असून, सार्वजनिक हितापेक्षा खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवले जात आहे. “विकासाच्या नावाखाली आम्हाला आमचा बाजार, आमची झाडं आणि आमचं पर्यावरण गमवावं लागतंय,” असा आरोप नागरिक करत आहेत. या बांधकाम प्रकल्पासाठी १०० हून अधिक प्रौढ झाडांची कत्तल होणार आहे, अशी माहिती समोर येत असून, पर्यावरणप्रेमींमध्येही यामुळे तीव्र अस्वस्थता आहे. “नागपूरला लंडनसारखं बनवण्याचा केवळ देखावा असून त्यासाठी हिरवळ नष्ट केली जाते आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिली आहे.
शहरात बिल्डरराज बळावतोय – स्वतंत्र पत्रकार अंजया अनपार्थीचा आरोप
खामला परिसरातील बाजार हटविल्यानंतर येथील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोबतच १०० हून अधिक झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणाला मोठी हानी पोहचणार आहे. या संपूर्ण घटनेवर स्वतंत्र पत्रकार अंजया अनपार्थी यांनी ‘नागपूर टुडे’शी संवाद साधला. खामला परिसरातील आतापर्यंत दोन हुन अधिक प्लॉट नागपूर महानगर पालिकेने एकाच बिल्डरला विकले आहे. यासंदर्भात आम्ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती काढली मात्र आम्हाला जमीन किती दरात विकण्यात आली याची माहिती मिळाली नाही. परिसरात ‘लंडन स्ट्रीट’च्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात येत आहे. जुना असलेल्या बाजारपेठ हटविण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. मनपा एकाच बिल्डरवर इतकी का मेहरबान आहे? असा असा सवाल अनपार्थी यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात हे चाललं तरी काय? असेही ते म्हणाले आहेत.
सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहराचे काँक्रीटीकारण –
नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकणी काँक्रीटीकारण करत पर्यावरणाचा नाश करण्यात आला आहे. फुटाळा तलावातील सिमेंटचे शॉवर, झाडं तोडून उभ्या केलेल्या चौपाट्या ही सर्व ठिकाणं नागपूरच्या हिरवाईचा गळा घोटत असल्याचा आरोप एका संतप्त नागरिकाने केला आहे. नागपूरचं भविष्य हिरवंगार राहणार की फक्त काँक्रीटच्या जंगलात बदलणार? आता वेळ आली आहे, झाडांसाठी, पर्यावरणासाठी आवाज उठवण्याची.