Published On : Sun, Jan 13th, 2019

स्वच्छतेबाबत मनपा आयुक्तांचा आकस्मिक दौरा

दररोज सकाळी विविध ठिकाणी स्वच्छतेची पाहणी

Mayor Nanda Jichkar

नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ संदर्भात शहरात सर्वत्र स्वच्छतेचा प्रचार प्रसार होत आहे. मात्र प्रत्यक्ष शहरातील सफाई कर्मचारी याबाबत किती गांभिर्याने कार्य करीत आहेत, याची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर दररोज सकाळी शहरातील विविध ठिकाणी आकस्मिक भेट देऊन दौरा करीत आहेत.

स्वच्छतेच्या बाबतीत होणाऱ्या कामचुकारपणावर आयुक्तांनी कठोर पवित्रा घेतला असून प्रत्येक झोनमधील स्थिती पाहण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्या केल्या असून पहिल्या तुकडीत आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, दुसऱ्या तुकडीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे व अझीझ शेख तर तिसऱ्या तुकडीत उपायुक्त राजेश मोहिते व नितीन कापडनीस यांचा समावेश आहे. तिन्ही तुकड्यांमधील अधिकारी सकाळी ७ ते १० या वेळेत शहरातील विविध भागांमध्ये संबंधित झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी, कनकचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत.

आतापर्यंत आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस यांनी शहरातील बसस्थानक, शाळा, उद्याने, तलाव, बाजार परिसरात भेट देऊन तेथील पाहणी केली आहे. शहरातील अंबाझरी, फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा या तलावांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन तलावातील गाळ, कचरा काढण्याचे निर्देश दिले. याशिवाय कॉटन मार्केट, कळमना बाजार, धरमपेठ, नेताजी बाजार, सक्करदरा, कमाल टॉकीज, गोकुळपेठ आदी बाजारांना भेट देऊन येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची सुद्धा पाहणी करून येथील स्वच्छतेबाबत निर्देश देण्यात आले.

स्वच्छतेच्या कामात बेजाबदारपणा बाळगणारे कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे तसेच ओला व सुका कचऱ्याचे योग्य संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याबाबतची पाहणी करून योग्य कार्यवाही करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्यादरम्यान ‘जीपीएस वॉच’ न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ‘जीपीएस वॉच’ न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुढेही कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला.