Published On : Mon, Sep 7th, 2020

मनपा व पोलिस प्रशासनाचा कोरोनाविरुध्द एकत्रित लढा

Advertisement

– महापौर, आयुक्तांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

नागपूर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिस संयुक्तपणे लढा देणार आहे. या बाबतचा निर्णय महापौर श्री.संदीप जोशी, पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

सोमवारी (७ सप्टेंबर) ला महापौर श्री. संदीप जोशी, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी नुकतेच रुजू झालेले पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांची भेट घेतली. महापौरांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पोलिस आयुक्तांचे स्वागत केले. मनपा आयुक्तांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

महापौर श्री.संदीप जोशी यांनी सांगितले की, मनपाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांच्या विरुध्द कारवाई सुरु केली आहे. सोबत सोशल डिस्टेसिंग पाळण्याकरिता भर दिला जात आहे. पोलिस आयुक्त सुध्दा मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुध्द मोहिम सुरु करत आहेत. त्यांनी सांगितले की पोलिस आयुक्तांसोबत ‘जनता कर्फ्यू’संदर्भात पण चर्चा झाली. कोरोनाविरोधात एकत्रित लढा उभारुन कोरोनाला नागपुरातून हद्दपार करायचे, असेही बैठकीत ठरले.

कोरोनायोद्धा असलेल्या पोलिसांना जर कोरोनाचे संक्रमण झाले तर त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भातही पावले उचलत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.