उत्पादनांच्या विक्रीकरीता ‘सुपर ३०’ महिलांचा पथदर्शी प्रकल्प
नागपूर : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मनपा च्या पुढाकाराला मदर डेअरीने सहकार्य दर्शविले असून मदर डेअरी च्या उत्पादन विक्रीमधून महिलांना आर्थिक उन्नतीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी प्रायोगीक तत्वावर ३० महिला सदस्यांची ‘सुपर ३०’ चमुची निवड करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात यासंबंधी बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, उपसभापती दिव्या धुरडे, मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मदर डेअरीचे डीजीएम स्वपन सिन्हा, व्यवस्थापक विनोद पांडव, अंकुर खंतवाल, प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नुतन मोरे तसेच झोननिहाय समुदाय संघटक आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व आणि मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटातील महिलांना स्वयं रोजगार मिळावा म्हणून मदर डेअरीच्या उत्पादन विक्रीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मदर डेअरीद्वारे तयार करण्यात येणा-या दुध, दही, मिस्टी दही, लस्सी, ताक, बटर, पनीर, चीज, मध, तुप, खाद्य तेल, आईसक्रीम, मटर, हराभरा कबाब, आलु टिक्की, फ्रेंच फ्राईज, स्वीट कॉर्न, टोमॅटो प्युरी, फणस, मिल्क शेक इत्यादी उत्पादनांची विक्री महिला सदस्यांमार्फत ग्राहकांच्या घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येईल .
यासाठी बैठकीत ३० महिला सदस्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या सदस्यांना मनपा व मदर डेअरीतर्फे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या सदस्यांमार्फत मदर डेअरीचे संबंधित उत्पादन घेऊन नागरिकांना घरपोच विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे नागरिकांना घरपोच उच्च प्रतीचे दैनंदिन उपयोगाचे उत्पादनांचा लाभ मिळणार आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. सद्या प्रायोगिक तत्वावर ३० महिलांची निवड करण्यात आली असून पुढे जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळवा यासाठी मनपातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छूकांना सर्व झोनच्या समाजकल्याण विभागात संपर्क साधता येईल.