Published On : Fri, Jul 26th, 2019

अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेणार सभागृहातून मान्यता

Advertisement

अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येवर तोडगा : शासनाकडेही करणार पाठपुरावा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील अग्निशमन विभागात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अनेक अडचणी येतात. कर्मचारी भरतीचा विषय महत्त्वाचा असून शासनाकडे कायमस्वरूपी भरतीकरिता पाठपुरावा सुरू आहे. मात्र शहरातील आठ स्थानकांमध्ये किमान आवश्यकतेनुसार भरतीसाठी सेवाप्रवेश नियमाप्रमाणे सभागृहातून मंजुरी घेण्यात येईल. तसा प्रस्ताव अग्निशमन विभागाने सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सभागृहाकडे पाठवावा, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी दिले.

अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक गुरुवारी (ता. २५) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपसभापती निशांत गांधी, सदस्य भारती बुंदे, सहायक आयुक्त महेश धामेचा, निगम अधीक्षक मदन सुभेदार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस.. मानकर, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर यांच्यासह सर्व स्थानकाचे स्थानाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कर्मचारी भरतीच्या मुद्यावर सांगोपांग चर्चा झाली. कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे आपत्तीच्या समयी मोठी अडचण येऊ शकते. कर्मचारी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्याचा तातडीने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले. यावर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करु. सोबतच तातडीने भरती करण्यासाठी ठराव क्र. १५५ आणि सेवाप्रवेश नियमावलीच्या अधीन राहून सभागृहाची मंजुरी घेण्यात येईल, त्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश सभापती ॲड. बालपांडे यांनी दिले.

यावेळी विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. गणवेश नियमावलीमध्ये सुधारणा करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सुधारणा करावी, असे निर्देश सभापतींनी दिले. त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकाचे काम लांबले आहे. १५ ऑगस्ट रोजी त्या स्थानकाचे उद्‌घाटन होईल, यादृष्टीने तातडीने सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी दिले. लकडगंज आणि वाठोडा अग्निशमन स्थानकाच्या प्रस्तावित बांधकामाच्या प्राकलनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या स्थानकासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढविण्याचे निर्देश यावेळी सभापतींनी दिले. रखडलेल्या प्रकल्पांबाबत लवकरच स्थापत्य व प्रकल्प समितीच्या सभापतींसोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही सभापती ॲड. बालपांडे यांनी सांगितले.

विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर यांनी यावेळी सोलर वॉटर हिटर आणि इतर योजनांबाबतची माहिती सभापतींना दिली. योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१०३ सोलर वॉटर हिटर वाटप करण्यात आले असून ३४७ वॉटर हिटर देणे बाकी आहे. योजनाचा कालावधी संपुष्टात आला असून अन्य सोलर वॉटर हिटर लवकरच वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. एल.ई.डी. वाटपासंदर्भातीलही माहिती यावेळी श्री. मानकर यांनी दिली.

बैठकीला अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्युत विभागाचे झोन उपअभियंता व प्रकल्प विभागाचे अधिकारी उपस्थित होते.