Published On : Fri, Jul 26th, 2019

लसीकरणाचा वेग वाढवा : अतिरिक्त आयुक्त राम जोशी

Advertisement

टास्क फोर्सची बैठक : लसीकरण कार्यक्रमाचा घेतला आढावा

नागपूर : नवजात शिशु आणि प्रत्येक बालकाला लसीकरण झाले पाहिजे यासाठी यंत्रणेने दक्ष राहायला हवा. कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, याची काळजी घेत लसीकरण कार्यक्रमाचा वेग वाढवा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.

शासनाच्या निर्देशानुसार शहरात आयोजित लसीकरण कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सची बैठक गुरुवारी (ता. २५) मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, लसीकरण अधिकारी डॉ. जी. एस. नवखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. बहीरवार, डॉ. साजीद, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. वांदले, डॉ. जे.के. चन्ने, डॉ. जी.पी. पावणे, डॉ. आतिक खान, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. विजय तिवारी, डॉ. पूर्वाली काटकर, वैद्यकीय अधिकारी (कुटुंब नियोजन) डॉ. वर्षा भोंबे, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानचे नितेश बाभरे, डॉ. राजेश बुरे, आरोग्य समन्वयक दीपाली नागरे उपस्थित होते.

सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून लसीकरणाची नोंद घेण्यात यावी, लसीकरण सत्राला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. लसीकरण सत्र रद्द होऊ नये याची काळजी घेण्यात यावी. कुणीही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, त्याचे संपूर्ण लसीकरण व्हावे यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले. बाळ जन्मल्यानंतर २४ तासाच्या आत द्यावयाची कावीळ आणि पोलिओची लस दिली जात नसल्याबद्दल यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.

आता धनुर्वात लसीच्या ठिकाणी नवीन धनुर्वात व घटसर्प ही लस सुरू करण्यात आली आहे. रोटा वायरस ही लस केवळ खासगी दवाखान्यात उपलब्ध राहायची. आता त्याचेही लसीकरण मनपा व अन्य शासकीय रुग्णालयात यापुढे उपलब्ध राहील, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. जी. एस. नवखरे यांनी दिली. आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात लसीकरण कार्यक्रम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.